मुंबई, (प्रतिनिधी) १८ जानेवारी - ‘आयुका’ अर्थात पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या अलीकडील एका संशोधनातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या संशोधनातील निष्कर्षांनुसार कमी तेजाचा पृष्ठभाग (Low-surface-brightness) असलेली मलिन 1 (Malin 1) ही आतापर्यंतची सर्वात मोठी ज्ञात आकाशगंगा, आपल्या शेजारील लहान बटु आकाशगंगांना (Dwarf galaxies) हळूहळू गिळंकृत करत असल्याचे या शास्त्रज्ञांना आढळले आहे. या संशोधनामुळे या आकाशगंगेची सुप्त वाढ आणि उत्क्रांतीबद्दलच्या सिद्धांतावर नव्याने प्रकाश पडला आहे.
मलिन 1 ही आकाशगंगा म्हणजे खगोलशास्त्रज्ञांसाठी दीर्घकाळापासून न सुटलेल्या कोड्यासारखीच राहिली आहे. या आकाशगंगेचा मध्यवर्ती भाग आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या चकतीसारखा आहे, तर तिच्या अत्यंत अंधुक सर्पिल आकारासारख्या भुजा जवळजवळ 3,00,000 प्रकाशवर्षा इतक्या अंतरापर्यंत विस्तारलेल्या आहेत. ही आकाशगंगा बाहेरून शांत आणि अलिप्त वाटत असली तरी, ती प्रत्यक्षात कोणत्याही क्रिया-प्रतिक्रियांचे संकेत न देता स्वतःच्या अंतरंगात बदल घडवून आणत असल्याचे आता समोर आले आहे.
संशोधकांच्या या पथकाने ॲस्ट्रोसॅट वरील अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपच्या (UVIT) निरीक्षणांचा वापर केला. त्याआधारे त्यांनी मलिन 1 च्या मध्यवर्ती भागात तरुण ताऱ्यांचे काही समूह ओळख पटवली आहे. त्यांना आढळलेल्या तार्यांच्या समुहांपैकी ‘सी1’ नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण समूह आपल्या प्रखर तेजामुळे आणि वस्तुमानामुळे उठून दिसत होता. मध्यवर्ती भागात ताऱ्यांची निर्मिती प्रक्रिया मंदावलेली असताना अशा प्रकारे नवीन ताऱ्यांचा समूह आढळणे हे संशोधकांसाठीही अनपेक्षित होते.
त्यानंतर या सगळ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी, शास्त्रज्ञांच्या पथकाने चिली इथल्या व्हेरी लार्ज टेलिस्कोप (VLT) वरील म्युझ (MUSE) उपकरणाच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यावेळी सी 1 हा ताऱ्यांचा समूह आपल्या आजूबाजूच्या घचकांपेक्षा ताशी सुमारे 150 किलोमीटर वेगाने फिरत असून, त्यात मोठी अंतर्गत हालचाल (Turbulence) होत असल्याचे संशोधकांना निरीक्षणात आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे, हा गट केवळ विशिष्ट वेगलहरींवरच दिसून येतो, यामुळे तो बाहेरून तिथे आल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
म्युझ (MUSE) वर्णपटाच्या विश्लेषणातून असे स्पष्ट झाले की, सी 1 समूहाच्या खाली 6 अब्ज वर्षांहून अधिक जुनी ताऱ्यांची लोकसंख्या आहे. प्रदीर्घकाळ शांत राहिल्यानंतर, गेल्या 200 दशलक्ष वर्षांत एक मोठा स्फोटानंतर या ताऱ्यांची निर्मिती झाली, ज्यातून अत्यंत तेजस्वी ताऱ्यांची उत्पत्ती झाली. मध्यवर्ती भागातील इतर समुहांमध्येही अशाच प्रकारच्या रासायनिक आणि वेगवान हालचालींचे संके मिळाले आहेत.
सी1 हा ताऱ्यांचा गट मलिन 1 मध्ये विलीन झालेल्या एका लहान बटु आकाशगंगेचा अवशेष असल्याचे या निरीक्षणावरून स्पष्ट झाले आहे. या विलीनीकरणामुळे मलिन 1 मध्ये नव्या वायूचा शिरकाव झाला असून त्यातून तरुण ताऱ्यांच्या निर्मितीला चालना मिळाली आहे. तसेच छोटी बटु आकाशगंगा अनेक तुकड्यांमध्ये विखुरली गेली असल्याचेही आढळून आले आहे.
हे संशोधन ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात डिसेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेल आहे. मलिन 1 मध्ये कशा प्रकारे सूक्ष्म विलीनीकरण होत आहे आणि तिचा मध्यवर्ती भाग पुन्हा कसा आकार घेत आहे, याचा ठोस पुरावा या संशोधनातून समोर आला आहे.
आयुकाचे (आययूसीएए) पीएचडीचे विद्यार्थी मनीष कटारिया हे या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आहेत. मलिन 1 सारख्या अवाढव्य आकाशगंगांच्या महाकाय आणि अंधकारमय रचना आकाशगंगा निर्मितीच्या विद्यमान सिद्धांतांना आव्हान देतात, आणि त्यामुळेच त्यांची वाढ कशी होते हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ॲस्ट्रोसॅट आणि म्युझ (MUSE) द्वारे मिळालेल्या माहितीसाठ्याचा एकत्रित वापर केल्यामुळे आकाशगंगांच्या उत्क्रांतीमध्ये लहान विलीनीकरणाची असलेली सुप्त भूमिका उलगडण्यास मदत झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी मलिन 1 वरील अतिनील किरणांच्या (यूव्ही ) माहितीचे परीक्षण करताना, ताऱ्यांचे हे समूह आपल्याला पहिल्यांदा दिसले असल्याचे आणि ते बाह्य स्रोताकडून आले असावेत असा त्यांचा कयास आपण बांधला होता असे प्राध्यापक कनक साहा यांनी सांगितले. आता म्युझद्वारे हाती आलेल्या माहितीमुळे आणि तपशीलवार विश्लेषणाने या गृहीतकावर शिक्कामोर्तब झाले असून, मलिन 1 हळूहळू लहान बटु आकाशगंगांना गिळंकृत करून स्वतःमध्ये बदल घडवत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले.