नाशिकमध्ये मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले... वेगवेगळ्या भागांतून तिघांचे अपहरण...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - नाशिक शहरात अल्पवयीन मुले आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलासह एकूण तीन जण अचानक बेपत्ता झाले आहेत. या तिघांनाही अज्ञात इसमांनी फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: शिवाजीनगर (सातपूर) - १७ वर्षीय मुलगी बेपत्ता
सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारी एक १७ वर्षीय मुलगी सोमवारपासून (१ जून) बेपत्ता आहे. सोमवारी रात्रीच्या वेळी घरातील कुणासही काहीही न सांगता ती घराबाहेर पडली, ती अद्याप परतलेली नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार ढमाले पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: श्रमिकनगर - १० वर्षांच्या बालकाचे अपहरण?
दुसरा प्रकार सातपूर परिसरातीलच श्रमिकनगर भागात घडला आहे. येथील गणेश कॉलनीत राहणारा एक १० वर्षांचा लहान मुलगा सोमवारपासून (१ जून) दुपारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला आहे. भरदिवसा घरातून गेलेला हा बालक अद्याप न परतल्याने परिसरात तर्कवितर्क लढवले जात असून, त्यालाही कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार सातपूर पोलिसांत देण्यात आली आहे.

तिसरी घटना: पिंपळगाव बहुला - १६ वर्षीय मुलगी बेपत्ता
तिसरी घटना सातपूर जवळील पिंपळगाव बहुला येथे घडली आहे. येथील नागरे मळा भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी (२ जून) सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडली, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. या प्रकरणीही मुलीला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे.
श्रमिकनगर आणि पिंपळगाव बहुला या दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांन्वये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे आणि पोलीस उपनिरीक्षक बुवा या प्रकरणांचा पुढील तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.