कळवण, सटाणा अन् मालेगावचा दुष्काळ हटणार...  चणकापूर धरणातून थेट...

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

 नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कायम दुष्काळी भागाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून चणकापूर धरणातून 'डावा कालवा' प्रस्तावित करावा आणि त्याचे सविस्तर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दुष्काळी तालुक्यांसाठी 'नवसंजीवनी'
नार-पार-औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे १०.६४ टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर, चणकापूर प्रकल्पातून डावा कालवा काढल्यास कळवण, सटाणा (बागलाण) आणि मालेगाव या तीन तालुक्यांतील अवर्षणग्रस्त भागांना मोठे वरदान लाभणार आहे. या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.

Advertisement

कोणकोणत्या गावांना होणार लाभ?
प्रस्तावित डाव्या कालव्यामुळे आणि विविध नद्यांद्वारे होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ खालीलप्रमाणे असेल:
 * कळवण तालुका: जयपुर, गोसराणे, गोपालखडी, जामनेपाळे, रवळजी, देसराणे, दरेभणगी या गावांना सिंचनाचा लाभ मिळेल. तसेच पुनद नदीद्वारे मोकभणगी ते भादवणपर्यंत फायदा होईल.
 * बागलाण (सटाणा) तालुका: डांगसौंदाणे, दहिंदुले, कपालेश्वर, किकवारी, विंचूर, विरगांव, निताने, पारनेर, सोमपूर यांसह अनेक गावांना लाभ होईल. आरम, हत्ती, कण्हेर, करंजाडी आणि मोसम नद्यांद्वारे सटाणा, वटार, आसखेडा व नामपूरपर्यंतच्या गावांना सिंचनाची सोय होईल.
 * मालेगाव तालुका: मोसम नदीद्वारे वळवाडे, खाकुर्डी, वडनेर, अजंग, वडेल, काष्टी, वजीरखेडे, वडगांव ते थेट मालेगाव शहरापर्यंतच्या भागाला फायदा होणार आहे.

शाश्वत विकासाला मिळणार चालना
"या कालव्यामुळे केवळ शेतीचे सिंचनच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा निकाली निघेल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन या परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळेल," असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet.