-हिरालाल रमेश चौधरी, (वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य, नाशिक)
जागतिक जलचर प्राणी दिन! या निमित्ताने महाराष्ट्राचे पहिले रामसर दर्जा प्राप्त पाणथळ क्षेत्र नाशिक जिल्ह्यातील 'नांदूर मध्यमेश्वर' अभयारण्यातील जलचरांच्या विश्वाचा घेतलेला हा एक मागोवा.
गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर वसलेले नांदूर मध्यमेश्वर हे केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर पाण्याखालील एका समृद्ध जीवसृष्टीसाठीही ओळखले जाते. या रामसर स्थळातील (Ramsar Site) संथ पाणी आणि त्यातील वनस्पती अनेक जलचर प्राण्यांना हक्काचे घर मिळवून देतात.
माशांची विविधता हे नांदूरमध्यमेश्वरचे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. नांदूर मध्यमेश्वरच्या जलाशयात माशांच्या सुमारे २४ पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. यामध्ये स्थानिक प्रजातींसोबतच काही दुर्मिळ मासेही पाहायला मिळतात. डॉ. प्रशांत वाघ जेष्ठ जलचर व पक्षी अभ्यासक यांनी नांदूरमध्यमेश्वर येथील माशांचा आणि जलचरांचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर अभ्यास केला व काही महत्त्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली आहेत. गोड्या पाण्यातील माशांच्या ४ प्रजाती हया ‘प्रदेशनिष्ठ (Endemic)’ आहेत. महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील २ माशांच्या प्रजाती हया जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या (Globally Threatened) यादितील आहेत. ज्यात शालिनी बार्ब (Shalyni Barb) ज्या माशाचा शोध ज्येष्ठ मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. ए.जी. पोंक्षे यांनी नाशिकमध्येच लावला होता. त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ या माशाला 'शालिनी' असे नाव दिले.
स्थानिक स्तरावर एखाद्या व्यक्तीच्या नावाने ओळखला जाणारा हा एक दुर्मिळ मासा आहे. त्याचप्रमाणे दुसरा मासा , देवळाली मिनो Deolali Minnow (Parapsilorhynchus prateri) Critically Endangered (अतिसंकटग्रस्त). हे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, प्रामुख्याने नद्यांच्या उथळ आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, जिथे ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, तिथेच हे मासे वाढतात परंतु मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या पानवेली/ जलपर्णी (Water Hyacinth) आणि टायफा ( Typha angustifolia) यांच्या वाढीमुळे तसेच शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळल्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊन अशा संवेदनशील माशांचा मृत्यू होतो आहे परिणामी पाणथळ परिसंस्था विस्कळीत होत आहे. नांदूर मध्यमेश्वर हे एक 'रामसर स्थळ' असल्याने, तिथे केवळ पक्ष्यांचेच नव्हे तर अशा दुर्मिळ स्थानिक माशांचेही संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. शालिनी बार्ब आणि देवळाली मिनो सारख्या प्रजाती जर सुरक्षित राहिल्या, तरच तिथली पक्ष्यांची अन्नसाखळी टिकून राहील. हे मासे केवळ जलपरिसंस्थेचा भाग नाहीत, तर येथे येणाऱ्या हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे मुख्य अन्न देखील आहेत. त्याचबरोबर असंख्य उभयचर आणि सरपटणारे जलचर पाण्याकाठी आणि पाण्यात वावरणारे अनेक जीव या परिसंस्थेचा कणा आहेत.
येथे प्रामुख्याने 'इंडियन फ्लॅपशेल टर्टल' (Indian Flapshell Turtle) पाहायला मिळतात. हे कासव जलाशयातील कचरा साफ ठेवण्यास मदत करतात.
बेडूक: पावसाळ्यात आणि हिवाळ्यात विविध प्रकारचे बेडूक येथे सक्रिय असतात, जे कीटकांपासून पर्यावरणाचे रक्षण करतात.
साप: पाण्यातील साप (Checkered Keelback) येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात, जे निसर्गचक्र संतुलित ठेवतात. हे सर्व जलचर नैसर्गिक स्वच्छतादूत असून पाण्यातील कीटक आणि अळ्या खाऊन पाण्याचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात.
सूक्ष्म जलचर आणि वनस्पती जलाशयातील 'फायटोप्लँक्टन' आणि 'झूप्लँक्टन' सारखे सूक्ष्म जीव डोळ्यांना दिसत नसले, तरी ते संपूर्ण अन्नसाखळीचा पाया आहेत. तसेच, पाण्यातील वनस्पती आणि शेवाळ हे जलचरांना लपण्यासाठी सुरक्षित जागा आणि प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.
या पाणथळ परिसंस्थेतील जलचाऱ्यांच्या संवर्धनाची गरज अतिमहत्वपूर्ण आणि गरजेची आहे.
जागतिक जलचर प्राणी दिनानिमित्त आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, वाढते प्रदूषण आणि जलपर्णी यांचे अतिक्रमण या जलचरांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरत आहे. नांदूर मध्यमेश्वरचे सौंदर्य आणि जैवविवीधता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सर्वस्तरांवर एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच आपण पुढच्या पिढ्यांना हा निसर्गाचा वारसा हस्तांतरित करू शकू.