कुंभमेळा ठरणार नाशिकच्या प्रगतीचा ‘बूस्टर डोस’... ३० हजार जणांना मिळणार मोफत कौशल्य प्रशिक्षण...

Share:
Main Image
Last updated: 02-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ एप्रिल - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ धार्मिक भक्तीचा सोहळा न राहता, तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा 'आर्थिक महाकुंभ' ठरणार आहे. या काळात सुमारे २७ हजार कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज कुंभमेळा प्राधिकरण आणि 'देआसरा फाउंडेशन' यांच्या संयुक्त अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाविकांकडून खर्च होणाऱ्या प्रत्येक १ रुपयामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत २ रुपयांहून अधिकची अतिरिक्त भर पडणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाने 'देआसरा फाउंडेशन'ला आपले ज्ञान भागीदार (Knowledge Partner) म्हणून नियुक्त केले आहे. या भागीदारीतून विकसित केलेल्या आराखड्यानुसार, ही उलाढाल प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि प्रेरित अशा तीन स्तरांवर होणार आहे.

उलाढालीचे गणित कसे असेल?
कुंभमेळ्यासाठी येणारे कोट्यवधी भाविक निवास, भोजन, स्थानिक वाहतूक आणि धार्मिक वस्तूंच्या खरेदीवर सुमारे ८,५०० ते ११,००० कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च करतील. या खर्चामुळे पुरवठा साखळी आणि सेवा क्षेत्रात सुमारे ७,८३० कोटींची अप्रत्यक्ष उलाढाल होईल. तसेच, यातून वाढलेल्या उत्पन्नामुळे स्थानिक व्यावसायिकांकडून होणाऱ्या खर्चामुळे आणखी १०,५३० कोटींचा 'प्रेरित' आर्थिक परिणाम दिसून येईल.

Advertisement

३० हजार स्थानिकांना रोजगाराची संधी
या संधीचे सोने स्थानिक सूक्ष्म व लघु उद्योजकांना करता यावे, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
 * कौशल्य प्रशिक्षण: ३० हजारांहून अधिक व्यक्तींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 * हॉकर्स झोन: मेळा क्षेत्रात सुमारे ५ हजार अधिकृत विक्री जागा (Stalls) उपलब्ध करून दिल्या जातील.
 * प्रमुख क्षेत्रे: अन्न सेवा, निवास, धार्मिक वस्तू विक्री, मनोरंजन आणि स्थानिक वाहतूक या ५ क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

प्रशासकीय मत:
"सिंहस्थ हा नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी मोठी आर्थिक संधी आहे. याचा थेट लाभ स्थानिक विक्रेते आणि लघु उद्योजकांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण
 
"सूक्ष्म उद्योजकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास कुंभमेळ्यामुळे होणारी आर्थिक वाढ दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक ठरेल."
— प्रज्ञा गोडबोले, CEO, देआसरा फाउंडेशन

Comments

No comments yet.