सटाण्यात लाचखोरीचा सापळा... हा अधिकारी जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 03-Nov-2026

 

सटाणा, (प्रतिनिधी) ३ नोव्हेंबर - वडिलोपार्जित घरावर वारसा हक्काने नाव लावून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सटाणा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. देवेंद्र मधुकर भावसार (वय ५१, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, बागलाण/सटाणा, वर्ग-२) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार (वय ४८, व्यवसाय: व्यापार) यांच्या दिवंगत वडिलांच्या नावे सटाणा शहरातील नेहरू रोड, कोर्ट गल्ली येथील भूमापन क्रमांक ७९९ मध्ये वडिलोपार्जित घर आहे. या घरावर वारसा हक्काने आपले नाव लावण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. मात्र, हे काम करून देण्यासाठी उपअधीक्षक देवेंद्र भावसार यांनी तक्रारदाराला कार्यालयात पैसे घेऊन येण्यास सांगून लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली.

Advertisement

पडताळणी आणि सापळा कारवाई

लाचलुचपत विभागाच्या पथकाने २८ ऑक्टोबर रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, भावसार यांनी तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर २ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७:०४ ते ७:१८ वाजेच्या सुमारास उपअधीक्षक कार्यालयातील कक्षात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ५०० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने देवेंद्र भावसार यांना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात (नाशिक ग्रामीण) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी आणि पोलीस अंमलदार किरण धुळे यांच्या पथकाने केली.

 

Comments

No comments yet.