मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सव संपन्न

Share:
Main Image
Last updated: 08-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ फेब्रुवारी - मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ  येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत होणारा पंचकल्याणक महोत्सव धार्मिक अनुष्ठान नाही, तर देशाच्या प्राचीन, आध्यात्मिक, परंपरा, शांती, करुणा आणि साधनेच्या उत्सवाचे प्रतीक आहे. तीर्थकारांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन बांधवासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

Advertisement

जग आज पर्यावरणाच्या समस्येशी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत जैन समाज प्राणीमात्रावर दया करण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. समाजाचा विकास हा देशाच्या विकासाशी जोडला असल्याचा संदेशही जैन समाज देतो. याबरोबरच हा समाज सेवा कार्यातही पुढे आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन मदत करीत असून परिसरात पायाभूत सोयीसुविधा आदी कामे झाली आहेत. उर्वरित कामासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

खासदार पटेल म्हणाले, चांदवड तालुक्यातील णमोकार हे महत्वाचे तीर्थ क्षेत्र ठरणार आहे.  देशविदेशातील समाज बांधव येथे येतील. हे तीर्थ क्षेत्र मानव कल्याणासाठी मार्गदर्शक ठरेल. जैन समाज विविध उद्योग व्यवसायात आघाडीवर आहे. त्याप्रमाणे हा समाज सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, असेही त्यांनी सांगितले. 

समितीचे पदाधिकारी पंधारी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी णमोकार तीर्थक्षेत्राची पाहणी करून आचार्य मुनी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, समितीचे पदाधिकारी संतोष पंधारी, कमल ठोलिया, विजय लोहाडी, डॉ. अतुल जैन, सुमेरसिंग काला, कीर्ती अजमेरा, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यासह आचार्य, समितीचे पदाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.