महाराष्ट्रात येथे होणार देशातील पहिले ‘गुलदार’ अंडरवॉटर संग्रहालय... ४६.९१ कोटी निधी, ८०० रोजगार...

Share:
Main Image
Last updated: 23-Jul-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २३ जुलै - महाराष्ट्राच्या सागरी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारत आहे. भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका ‘गुलदार’ (INS Guldar) च्या माध्यमातून ‘पाण्याखालील संग्रहालय (Underwater Museum), कृत्रिम रीफ (Artificial Reef) आणि पाणबुडी पर्यटन’ हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत दिली.

४६.९१ कोटींचा भव्य प्रकल्प
पर्यटन मंत्रालयाच्या ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील या ऐतिहासिक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
एकूण तरतूद: आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या प्रकल्पासाठी ४६.९१ कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.
प्रकल्पाचे स्वरूप: निवृत्त युद्धनौका 'गुलदार'ला समुद्राच्या तळाशी नेऊन तिथे 'अंडरवॉटर म्युझियम' आणि 'कृत्रिम रीफ' (ज्यामुळे सागरी जीवसृष्टीला प्रोत्साहन मिळेल) तयार केले जाईल. तसेच पर्यटकांसाठी पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सुविधा उपलब्ध केली जाईल.

Advertisement

८०० प्रत्यक्ष नोकऱ्या आणि पर्यटनाला चालना
महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (DPR), हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षांच्या कालावधीत स्थानिक पातळीवर सुमारे ८०० प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जगभरातील पर्यटकांचा ओघ वाढणार असून स्कुबा डायव्हिंग, सागरी संशोधन आणि स्थानिक आदरातिथ्य (Hospitality) व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे.

वेळेत अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारचे लक्ष
केंद्रीय पर्यटन मंत्रालय या प्रकल्पाच्या प्रगतीवर वेळोवेळी आढावा बैठकांद्वारे लक्ष ठेवून आहे. राज्य शासनाला येणाऱ्या अडचणी व अडथळ्यांचे तातडीने निराकरण करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करत असल्याचेही पर्यटनमंत्र्यांनी संसदेत स्पष्ट केले.

Advertisement

Comments

No comments yet.