'यंग इंडिया'वर पैशांचा पाऊस... विश्वविजेत्या युवा संघाला इतके कोटी मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 07-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - झिम्बाब्वेच्या भूमीवर तिरंगा फडकवत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणार्‍या भारतीय १९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. या ऐतिहासिक विजयाची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विजयी संघासाठी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या भरघोस बक्षिसाची घोषणा केली आहे.

अपराजित राहून कोरले जेतेपदावर नाव
हरारे येथे झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारताने हे जेतेपद पटकावले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या बक्षीस रकमेची घोषणा करताना म्हटले की, "संपूर्ण देशाला आणि बीसीसीआयला या युवा खेळाडूंचा अभिमान आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मैदानात वर्चस्व गाजवले, ते पाहता भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातांत असल्याचे स्पष्ट होत आहे."

वैभवची 'विराट' खेळी आणि आयुषचे नेतृत्व
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४११ धावांचा डोंगर उभा केला होता. यात अवघ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १७५ धावांची वादळी खेळी करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. कर्णधार आयुष म्हात्रेनेही ५३ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांवर गारद झाला आणि भारताने सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

बक्षिसाचे स्वरूप
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेले ७.५ कोटी रुपये हे खेळाडू, मुख्य प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात विभागले जाणार आहेत. १९ वर्षांखालील संघाला दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मानली जात आहे. यापूर्वी २०२५ मध्ये महिलांच्या युवा संघाने विश्वचषक जिंकला असता त्यांना ५ कोटींचे बक्षीस देण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावरून या 'यंगिस्तान'चे अभिनंदन केले असून, हा विजय देशातील लाखो युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.