जळगाव, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - शासनाच्या वतीने राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वाकांक्षी योजना सन २०१९ पासून राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या मार्फत प्रभावीपणे अंमलात आणली जात असून, यात नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत पात्र उत्पादन आणि सेवा उद्योगांसाठी अर्ज करता येणार असून, उत्पादन उद्योगासाठी १ कोटी रुपये व सेवा उद्योगासाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येणार आहे. १८ वर्षे पूर्ण झालेले, कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेले व यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानाधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ न घेतलेले स्थानिक रहिवासी या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच ठराविक मर्यादेपेक्षा अधिक प्रकल्प रकमेच्या उद्योगासाठी अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
योजनेत उत्पादन, सेवा, कृषीपूरक व कृषीआधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रँडआधारित साखळी विक्री केंद्रे, फिरते खाद्यान्न केंद्र, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल-ढाबा, होम-स्टे, क्लाऊड किचन आदी उद्योगांचा समावेश आहे. अनुसूचित जाती-जमाती, महिला, इतर मागासवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक, विमुक्त व भटक्या जमाती तसेच अल्पसंख्याक प्रवर्गातील अर्जदारांना शहरी भागासाठी २५ टक्के व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान देण्यात येणार असून, इतर प्रवर्गातील अर्जदारांना शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदान मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी http://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र / खादी ग्रामोद्योग मंडळ, सदगुरु एज्युकेशन सोसायटी इमारत, ख्वाजामिया चौक, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
तसेच ही योजना व या कार्यालयाकडुन राबविण्यात येणा-या इतर योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडुन कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणुक केली जात नाही. या योजनांमध्ये खाजगी व्यक्तीकडुन फसवणुक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर परिपुर्ण आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज करावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले आहे.