नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ६ फेब्रुवारी - देशातील विधी शिक्षणाचे नियमन करणाऱ्या 'भारतीय बार कौन्सिल'ने (BCI) एक महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०००-२००१ पासून कोणत्याही राज्यातील संध्याकाळचे (Evening), अर्धवेळ, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीने घेतलेले एलएलबी (LLB) अभ्यासक्रम वैध नसून, त्यांना बार कौन्सिलची मान्यता नसल्याचे सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे.
कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मेघवाल यांनी स्पष्ट केले की, बार कौन्सिलने कायदेशीर शिक्षण नियम, १९९९ अन्वये सर्व राज्यांमधील संध्याकाळच्या विधी पदवी अभ्यासक्रमांची मान्यता बंद केली आहे.
काय आहेत नवे नियम?
बार कौन्सिलच्या २००८ च्या नियमांनुसार, एलएलबी हा एक 'नियमित आणि पूर्णवेळ' व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. यासाठी ठराविक दैनंदिन आणि साप्ताहिक वर्गतास असणे अनिवार्य आहे. तसेच, किमान उपस्थिती आणि सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेतच अध्यापन होणे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्र शाळा, अंशकालीन, सप्ताहअखेर (Weekend), सुट्टीतील किंवा ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या पदव्यांना कोणतीही वैधानिक मान्यता नाही.
जुन्या पदवीधरांचे काय?
ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष १९९९-२००० पर्यंत संध्याकाळच्या वर्गांद्वारे एलएलबी पूर्ण केली आहे, केवळ त्यांनाच वकील म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, २०००-०१ नंतर अशा प्रकारे अर्धवेळ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना वकील म्हणून नोंदणी करता येणार नाही आणि त्यांची पदवी वकील व्यवसायासाठी पात्र मानली जाणार नाही.
महत्त्वाचे मुद्दे:
२०००-०१ पासून संध्याकाळचे विधी वर्ग अवैध.
LLB केवळ पूर्णवेळ व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून ग्राह्य.
ऑनलाइन आणि दूरस्थ (Distance) शिक्षणालाही मान्यता नाही.
सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच वर्ग होणे अनिवार्य.
विधी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश घेताना या नियमांची दखल घेणे आवश्यक असल्याचे आवाहनही याद्वारे करण्यात आले आहे.