नाशिक, (प्रतिनिधी) ४ फेब्रुवारी - नाशिक त्रंबकेश्वर महाकुंभाचा जागतिक स्तरावर लौकिक होणार असून यासाठी सर्वांचे योगदान तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले आहे.आज मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने अखाड्यांमध्ये सुरू असलेल्या विविध कामांचे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. श्री पंच दशनाम जूना अखाडा (पिपलद) या ठिकाणी सदर मुख्य भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व १० शैव पंथ अखाड्यांमध्ये भेट देऊन त्या ठिकाणी कामांचा शुभारंभ भूमिपूजन केले आहे.
यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी अखाडा), अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष श्री महंत शंकराआनंद सरस्वती, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त श्री. शेखर सिंह जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्षा त्रिवेणी ताई तुंगार, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, सर्व आखाड्यांचे महंत, साधू, संत व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा निश्चितच महंत,साधु,संत, यांच्यासाठी असून त्यांच्या सहभागाशिवाय कुंभ होणे शक्य नाही. कुंभमेळा चे नियोजन करत असताना सर्व यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारून कामे युद्ध पातळीवर करावीत. विकास कामे करताना गुणवत्ता व दर्जेदार असावी यामध्ये कोणती तडजोड होता कामा नये असे निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय यंत्रणांना दिलेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पंचदशनाम जुना आखाडा, आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा, निरंजनी आखडा, बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाड्यांना भेटी देत तेथे देखील कामाचा शुभारंभ नारळ वाढवून केला.
यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त करून शासनास व प्रशासनास कुंभमेळाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. महंत शंकरा आनंद सरस्वती यांनी देखील सर्व महंत,साधु, संत यांच्यावतीने प्रशासनाचे व शासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहे. व सर्वांच्या प्रयत्नातून कुंभमेळाचे यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी शासनाच्या विविध यंत्रणांचे अधिकारी देखील उपस्थित होते. आखाड्यांच्या विविध विकास कामांबरोबरच त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या घाटाचे बांधकाम शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आले.