मुंबई, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या बातम्या 'निराधार' असल्याचे स्पष्ट करत, पटेलांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाची विधाने केली आहेत.
'अध्यक्षपदाच्या बातम्या अफवाच'
गेल्या दोन दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चर्चा रंगली होती. अगदी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही एका मुलाखतीत तसे सूतोवाच केले होते. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटर (X) द्वारे या वृत्ताचे खंडन केले. "राष्ट्रवादी काँग्रेस ही एक लोकशाही मानणारी संघटना आहे. अशा मोठ्या निर्णयासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करणे आवश्यक असते. अध्यक्षपदाबाबतच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही," असे पटेलांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता त्यांना पक्षाचे अध्यक्षपदही दिले जावे, अशी मागणी पक्षातील एका गटाकडून होत आहे. याबाबत बोलताना पटेल म्हणाले की, "सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांच्या नावाबाबत पक्षात कोणताही विरोध नाही. मात्र, सध्या पवार कुटुंब दु:खात असल्याने कोणताही संघटनात्मक निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाशी चर्चा केली जाईल."
राजकीय समीकरणांकडे लक्ष
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, प्रफुल्ल पटेलांनी ही स्पष्टोक्ती देऊन तूर्तास 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे संकेत दिले आहेत. १३ दिवसांच्या सुतकानंतरच पक्षाच्या पुढील वाटचालीचा आणि पूर्णवेळ अध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.