राज्य सरकारकडून 'स्पर्श' आणि 'कुसुम' मोहिम... असा होणार तुम्हाला फायदा...

Share:
Main Image
Last updated: 02-Feb-2026

नंदुरबार, (प्रतिनिधी) २ फेब्रुवारी - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि 'कुसुम' (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याला कुष्ठरोगमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

​"भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या"
​यंदाच्या स्पर्श मोहिमेचे मुख्य घोषवाक्य 'भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या' हे असून, कुष्ठरोगाबाबत समाजातील भीती आणि गैरसमज दूर करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट आणि बाजारपेठांमध्ये पथनाट्ये, प्रभात फेऱ्या, मॅरेथॉन आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

​'कुसुम' मोहिमेद्वारे ७५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण
​२०२७ पर्यंत 'शून्य कुष्ठरोग प्रसार' साध्य करण्यासाठी 'कुसुम' मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
​लक्ष्य गट: स्थलांतरित कामगार, वीटभट्टी मजूर, कारागृहातील कैदी, आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि कारखान्यातील कामगार.
​यंत्रणा: २२३ पथके आणि ७,५१८ आशा व पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने ३१२ अतिसंवेदनशील भागांतील ७५,१८७ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
​उपचार: संशयित रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करून संसर्गाची साखळी तोडण्यावर भर दिला जाणार असल्याचे सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

​कुष्ठरोगाची लक्षणे ओळखा:
शरीरावर लालसर, फिकट किंवा संवेदना नसलेला चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळीवर गाठी किंवा हाता-पायांत अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

​प्रशासनाचे आवाहन
​कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. लवकर निदान झाल्यास शारीरिक विकृती टाळता येते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भीतीपोटी आजार न लपवता तपासणी करून घ्यावी आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.