नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २ फेब्रुवारी - भारतीय रेल्वेने रेल्वे सुरक्षेच्या दिशेने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील तीन महत्त्वाच्या रेल्वे विभागांमधील ४७२.३ मार्ग किलोमीटर अंतरावर स्वदेशी बनावटीची 'कवच ४.०' (स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली) यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात आणि एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कवच प्रणाली कार्यान्वित होण्याची ही आतापर्यंतची पहिलीच वेळ आहे.

सुरक्षेचे त्रिकूट: तीन विभागांत प्रणाली सक्रिय
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन टप्प्यात पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे या तीन विभागांचा समावेश आहे. यामुळे रेल्वे गाड्यांची धडक रोखणे, वेग नियंत्रण आणि मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळणे अधिक सुलभ होणार आहे.
नव्याने कार्यान्वित झालेले विभाग:
पश्चिम रेल्वे: बडोदा ते विरार (३४४ किमी)
उत्तर रेल्वे: तुघलकाबाद जंक्शन केबिन ते पलवल (३५ किमी)
पूर्व मध्य रेल्वे: मानपूर ते सरमातनर (९३.३ किमी)
जुना विक्रम मोडीत
यापूर्वी एकाच वेळी सर्वाधिक ३२४ मार्ग किलोमीटरवर कवच प्रणाली कार्यान्वित करण्याचा विक्रम पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा-मथुरा विभागाच्या नावावर होता. आजच्या ४७२.३ किमीच्या समावेशामुळे हा विक्रम मोडीत निघाला आहे. आता 'कवच आवृत्ती ४.०' भारतीय रेल्वेच्या एकूण पाच क्षेत्रांमध्ये कार्यरत झाली आहे.
एकूण व्याप्ती १३०० किलोमीटरच्या पार
या ताज्या अपडेटमुळे भारतीय रेल्वेच्या नेटवर्कवर 'कवच ४.०' ची एकूण व्याप्ती आता १,३०६.३ मार्ग किलोमीटर इतकी झाली आहे. यापूर्वी ही प्रणाली ८३४ मार्ग किलोमीटरवर कार्यरत होती. उच्च-घनतेच्या मार्गांवर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीला मोठी गती दिली आहे.
काय आहे 'कवच'? 'कवच' ही भारताने विकसित केलेली स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली (ATP) आहे. जर लोको पायलटने सिग्नल ओलांडला किंवा गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त झाला, तर हे तंत्रज्ञान आपोआप ब्रेक लावून अपघात रोखते. तसेच खराब हवामानात किंवा धुक्यातही ही प्रणाली रेल्वेला सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत करते.