मुंबई, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आणली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. "अजितदादा आणि माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते, ते माझ्याशी सर्व काही शेअर करायचे. त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या एक तास आधीही आमची चर्चा झाली होती. विलीनीकरणाबाबत काय घडलंय, याची मला पूर्ण कल्पना आहे," असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
‘मी सर्व गोष्टींचा साक्षीदार’
अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या घटनाक्रमावर भाष्य करताना मुख्यमंत्री भावूक झाले, मात्र त्याचवेळी त्यांनी राजकीय संकेतही दिले. फडणवीस म्हणाले की, "मी या सर्व घडामोडींचा साक्षीदार आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाबतीत पडद्यामागे नक्की काय हालचाली झाल्या, काय घडतंय, हे मला पूर्णपणे माहीत आहे. सध्याच्या स्थितीत मला राजकारण करायचे नाही, अन्यथा मी अनेक गोष्टी उघड करू शकतो." मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे 'ती' गुपितं नेमकी कोणती, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विलिनीकरणाबाबत भाजपची भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. "विलीनीकरण करायचे की नाही, हा सर्वस्वी त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष म्हणून त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित आहे," असे फडणवीस यांनी नमूद केले. राष्ट्रवादीकडून यापुढेही समन्वयाची भूमिका घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली आणि मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवलेली 'ती' माहिती राज्याच्या राजकारणाला कोणती कलाटणी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.