नाशिकमध्ये लाल वादळ... ५० हजार शेतकऱ्यांचा भव्य 'लाँग मार्च' सुरू...

Share:
Main Image
Last updated: 25-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ जानेवारी - पालघरमधील ऐतिहासिक विजयानंतर, आता नाशिकमध्येही शेतकऱ्यांच्या संघर्षाचा बिगुल वाजला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या 'कॉर्पोरेटधार्जिण्या' धोरणांविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० ते ५० हजार शेतकऱ्यांचा भव्य लाँग मार्च आज नाशिकमधून मुंबईच्या दिशेने झेपावला आहे.

बड्या नेत्यांचे नेतृत्व
या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आणि इंद्रजित गावीत यांसारखे दिग्गज नेते करत आहेत. या नेत्यांच्या आवाहनावर हजारो शेतकरी हातात लाल झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

आंदोलनाचे दोन मुख्य पैलू

१. आश्वासनांची पूर्तता: वनाधिकार कायदा (FRA) आणि पेसा (PESA) अंतर्गत जमिनींचे हक्क, सिंचन योजनांची अंमलबजावणी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त जागा भरण्याबाबत सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पायमल्ली केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

२. कॉर्पोरेट धोरणांचा विरोध: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर प्रखर टीका करत, 'स्मार्ट मीटर' योजना, मनरेगाला लावलेला सुरुंग आणि कामगारांवर लादल्या जाणाऱ्या चार श्रम संहिता यांविरुद्ध शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

"सरकार केवळ आश्वासने देते, पण अंमलबजावणी करत नाही. जोपर्यंत जमिनीचा प्रश्न आणि कॉर्पोरेटची लूट थांबत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील."
— नेतृत्व समिती, किसान सभा.

पालघर विजयाची प्रेरणा
२१ जानेवारी रोजी पालघरमध्ये ५०,००० लोकांच्या मोर्चाने सरकारला नमवल्यानंतर नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. "पालघर जिंकले, आता नाशिकही जिंकू," अशा घोषणांनी नाशिकचा परिसर दणाणून गेला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.