नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २४ जानेवारी - नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) च्या वतीने आयोजित केला जाणारा जगातील सर्वात भव्य आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव, अर्थात 'भारत रंग महोत्सव २०२६' (BRM) यंदा आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. येत्या २७ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रंगणारा हा महोत्सव आजवरचा सर्वात व्यापक आणि सर्वसमावेशक ठरणार असून, यात २७७ भारतीय व आंतरराष्ट्रीय सादरीकरणांचा थरार पाहायला मिळणार आहे.
देशभरातील ४० केंद्रांवर नाटकांचा जागर
यंदाचा महोत्सव केवळ महानगरांपुरता मर्यादित न राहता देशातील ४० विविध केंद्रांवर आयोजित केला जाईल. यात प्रथमच लडाख, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, मिझोरम (आयझॉल) आणि मेघालय (तुरा) यांसारख्या दुर्गम भागांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जगातील सातही खंडांतील प्रतिनिधीत्व असलेल्या देशांतील नाट्यनिर्मिती यात सहभागी होणार असल्याने महोत्सवाचा जागतिक दबदबा अधिक अधोरेखित होणार आहे.
भाषिक वैविध्य आणि सामाजिक समावेशकता
या महोत्सवात २२८ हून अधिक भाषा आणि बोलीभाषांमधील नाटके सादर होतील. मैथिली, भोजपुरी, तुळू, संस्कृत यांसारख्या प्रमुख भाषांसह अनेक आदिवासी आणि विलुप्तप्राय भाषांनाही यात व्यासपीठ मिळाले आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत यंदा प्रथमच ट्रान्सजेंडर समुदाय, लैंगिक कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नाट्यसंस्थांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
महापुरुषांना मानवंदना आणि दिग्गज कलावंतांचे स्मरण
महोत्सवाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा, अहिल्याबाई होळकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल. तसेच इब्राहिम अल्काझी, रतन थियाम, बन्सी कौल आणि दया प्रकाश सिन्हा यांसारख्या रंगभूमीवरील दिग्गजांना विशेष आदरांजली वाहिली जाणार आहे. कर्करोगावर मात केलेल्या एका माजी विद्यार्थ्याचे विशेष नाट्य सादरीकरण हे या महोत्सवाचे भावनिक आकर्षण असेल.
या महोत्सवात केवळ नाटकेच नव्हे, तर भारताच्या खाद्यपरंपरा आणि हस्तकलांचे स्टॉल्सही असणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव मिळेल.

काय असतील मुख्य आकर्षणे?
थिएटर बाजार: नवीन नाटकांना प्रोत्साहन, पुरस्कार आणि १७ पुस्तकांचे प्रकाशन.
विविध उपमहोत्सव: आदिरंग (आदिवासी नाट्य), जश्ने बचपन (बालनाट्य), आणि कठपुतळी महोत्सव.
महिला दिग्दर्शकांचा सहभाग: ३३ नाटकांचे दिग्दर्शन महिलांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय सहयोग: पोलंड, स्पेन आणि रशियामधील नामांकित नाट्य संस्थांशी भागीदारी.
"भारत रंग महोत्सव हा केवळ उत्सव नसून तो रंगभूमीच्या लोकशाहीकरणाचे प्रतीक आहे. हा 'लोकांचा, लोकांनी आणि लोकांसाठी' असलेला महाकुंभ असून जिथे विविध विचारधारा आणि संस्कृती एकत्र येतात."
— प्रा. भरत गुप्त (उपाध्यक्ष) व चित्तरंजन त्रिपाठी (संचालक), एनएसडी.