पुणे, (विशेष प्रतिनिधी) २२ जानेवारी - गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतणार आहे. उद्या शुक्रवार, २३ जानेवारीपासून राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून, सध्या जाणवणारे ढगाळ वातावरण आज सायंकाळपासून निवळण्यास सुरुवात होईल. प्रजासत्ताक दिनापर्यंत (२६ जानेवारी) राज्याच्या विविध भागांत किमान तापमानात घट होऊन गारठा वाढणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
ढगाळ हवामानाचे आज शेवटचे सावट मंगळवार दि. २० जानेवारीपासून राज्यात थंडी काहीशी कमी झाली होती. आज गुरुवार दि. २२ रोजी मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हे वातावरण केवळ आजच्या दिवसापुरतेच मर्यादित असून, उद्यापासून हवामानात मोठी सुधारणा होईल आणि थंडीचा कडाका पुन्हा जाणवेल.
का वाढला होता उकाडा? माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळकार (Anti-cyclone) चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरातून ताशी २५ ते २७ किमी वेगाने आर्द्रतायुक्त वारे वाहत होते. या दमट वाऱ्यांमुळेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या ३ दिवसांपासून थंडी गायब होऊन दमट आणि ढगाळ वातावरण तयार झाले होते.
पुढील ४ दिवसांचा अंदाज * २३ ते २६ जानेवारी: राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार.
* प्रजासत्ताक दिन: २६ जानेवारीपर्यंत थंडीचा हा प्रभाव कायम राहण्याची शक्यता.
* क्षेत्र: उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत किमान तापमानात लक्षणीय घट होऊ शकते.
"उद्यापासून हवामानात सुधारणा होईल. आर्द्रता कमी झाल्यामुळे कोरड्या आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढून पुन्हा एकदा हुडहुडी भरेल." > — माणिकराव खुळे (निवृत्त हवामान शास्त्रज्ञ, IMD पुणे)