नाशिक, (प्रतिनिधी) २२ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथवर होणाऱ्या संचलनात नाशिकच्या कीर्ती कला मंदीराच्या बारा विद्यार्थिनींची सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड झाली असून या विद्यार्थिनी राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मंत्रीमहोदयांसोबर कथक नृत्य सादर करणार आहेत.
बारा मुलींचा संघ १२ जानेवारी रोजी ओझर विमानतळावरून रवाना झाला. दिल्लीतील एका स्टेडीयमवर त्यांचा सराव सुरू झाला असून बॉलिवूड तसेच संगीत नाटक कला अकादमी, कथक कला केंद्र अशा नामवंत संस्थांच्या कलाकारांचा चमू त्यांचे नृत्य दिग्दर्शन करीत आहे. दर वर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्यपथवर हा भव्य दिव्य सोहळा राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होत असतो. कर्तव्य पथ हे भारताच्या लोकशाही मूल्यांचे, शौर्याचे आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे. येथे प्रजासत्ताक दिनी सादर होणारे प्रत्येक पाऊल देशाच्या एकतेचे, शिस्तीचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवते. अशा पवित्र राष्ट्रीय मंचावर भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणे हे प्रत्येक कलाकारासाठी सन्मान आणि अभिमानाचे शिखर मानले जाते. यंदा २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यात कर्तव्य पथावर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान कीर्ती कला मंदिर कथक नृत्य संस्थेला मिळाला आहे. या मानाच्या निमित्ताने संस्थेच्या युवा कथक नृत्यांगना दिल्ली येथे आपली कला सादर करणार आहेत. या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय पातळीवरील मंचावर सहभागी होण्यासाठी संस्थेतील याज्ञश्री चंद्रशेखर दारव्हेकर, लावण्या फणिंद्र मंडलिक, स्वानंदी नितीन मनभेकर, सई सुनील गडकरी, गौरी किरण चांदवडकर, गार्गी अमित गरुड, पायल ज्ञानेश्वर भट, शलाका सुमंत जोशी, आर्या नंदु मोरे, आनंदी मंगेश नांदुस्कर, समृद्धी विकास अहिरे, श्रावणी मनोहर कराड या युवा कथक नृत्यांगनांची निवड झाली आहे.
या मुली आपल्या अभिजात कथक नृत्याच्या माध्यमातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा देश-विदेशातील प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. कीर्ती कला मंदिर कथक नृत्य संस्थेच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कला क्षेत्राला गौरव प्राप्त झाला असून संस्थेच्या अदिती, पानसे आणि रेखाताई नाडगौडा या गुरुद्वयांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण साधना आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाचे हे फलित आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र राष्ट्रीय उत्सवात कथक या शास्त्रीय नृत्यशैलीचे प्रतिनिधित्व होणे ही नाशिकच्या कला विश्वासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून ही निवड केली जाते. विविध दिग्गज परिक्षक यासाठी असतात. अत्यंत बारकावे पाहून ही निवड करण्यात येते. यासाठी विविध कसोट्या पार कराव्या लागतात. आमच्या कीर्ती कलामंदिराच्या सर्व विद्यार्थीनींनी सर्व कसोट्या पार करून हे यश मिळवले आहे. गुरु रेखाताई नाडगौडा यांचा अशिर्वाद त्यांच्या पाठीशी होता. महाराष्ट्र हा मान मिळवणारी कीर्ती कलामंदीर ही एकमेव संस्थ आहे.
आदिती नाडगौडा- पानसे, कथक गुरू