मुंबई, (प्रतिनिधी) १९ जानेवारी - मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीच्या विकासाच्या धोरणावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. ज्या दिवशी मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, तो दिवस मुंबईकरांसाठी 'सुवर्ण दिवस' असेल, तर १६ जानेवारीचा निकालाचा दिवस उबाठा गटासाठी 'काळा दिवस' ठरला आहे, अशी सणसणीत टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर प्रहार करताना म्हटले की, "संजय राऊतांनी मुंबईच्या महापौरपदाची कितीही दिवास्वप्ने पाहिली, तरी ती कधीही पूर्ण होणार नाहीत. राऊत जी स्वप्ने पाहतात ती नेहमीच भंगतात, ही वस्तुस्थिती आहे."
लूट थांबवून विकास करणे हेच आमचे ध्येय
महापालिकेत कोणाचा महापौर व्हावा, हा महायुतीचा कधीच अजेंडा नव्हता, असे स्पष्ट करत बन म्हणाले की, "गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगताना उबाठा गटाने मुंबईला लुटण्याचे काम केले. ही लूट थांबवून मुंबईकरांचे जीवन सुकर आणि सुरक्षित करणे हेच आमचे ध्येय आहे. २९ पैकी २५ जागांवर भाजपा अव्वल ठरली असून, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे."
मानखुर्दचा विजय कार्यकर्त्यांचा
मानखुर्द शिवाजीनगरमधील विजयाबाबत बोलताना नवनाथ बन यांनी सांगितले की, "लोकसभा निवडणुकीत याच भागामुळे भाजपाला फटका बसला होता. मात्र, मतदारांनी यावेळेस विकासाला कौल देत भाजपाला निवडून दिले आहे. हा विजय माझा वैयक्तिक नसून त्या परिसरातील प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचा विजय आहे."
राऊतांच्या कौतुकाची गरज नाही!
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे केलेल्या कौतुकाचा समाचार घेताना बन म्हणाले की, "आज राऊतांना उशिरा का होईना उपरती झाली आहे. खरे तर फडणवीस यांच्या कामाला राऊतांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, कारण त्यांना जनतेचा आशीर्वाद आधीच मिळाला आहे. तरीही भाजपाच्या संस्कारानुसार आम्ही या कौतुकाबद्दल आभार मानतो."
नगरसेवकांना एकत्र ठेवण्यावरून टोला
शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना बन यांनी स्पष्ट केले की, हे केवळ एकमेकांच्या परिचयासाठी आहे. "भीती शिवसेनेला नाही, तर उबाठा गटाला आहे. राऊतांनी उगाच 'खयाली पुलाव' शिजवू नयेत. नगरसेवकांना एकत्र ठेवण्यामुळे नवीन आघाडी किंवा समीकरण तयार होईल, असा भ्रम त्यांनी पसरवू नये," असा टोला त्यांनी लगावला.
बिहार भवनावरून मनसेवर टीका
महाराष्ट्र भवन जसे इतर राज्यात आहे, तसेच महाराष्ट्रात 'बिहार भवन' होण्यात काहीही गैर नाही, असे मत बन यांनी व्यक्त केले. "या विषयावरून मनसे विनाकारण प्रांतवाद उकरून काढत आहे. अशा भाषावाद आणि प्रांतवादामुळेच मनसेची आज काय अवस्था झाली आहे, याचा विचार राज ठाकरे यांनी करावा," असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.