इतके नेते सोडून गेले तरी उद्धव ठाकरेंनी काय गमावलं? भाजपानं काय मिळवलं? शिंदेंच्या पदरात काय?

Share:
Main Image
Last updated: 17-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ जानेवारी - देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा रणसंग्राम अखेर शांत झाला असून, निकालांच्या आकड्यांनी राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे. सत्तेच्या गणितात भाजप आणि शिंदे गट (महायुती) बहुमतापर्यंत पोहोचले असले, तरी मुंबईच्या जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवला आहे, तो भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ठाकरेंची फिनिक्स भरारी
शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे बोटावर मोजण्याइतके नगरसेवक उरले होते. मात्र, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर आणि नवीन चेहऱ्यांना संधी देत ठाकरेंनी ६५ जागांवर विजय मिळवून 'ठाकरे ब्रँड'ची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. संसाधनांची कमतरता आणि सत्तेचा प्रचंड दबाव असतानाही 'शून्यातून' उभे राहत ठाकरेंनी मिळवलेले हे यश भाजपच्या ८९ जागांच्या विजयापेक्षाही मोठे मानले जात आहे.

भाजपचे 'नैतिक' अपयश?
२०१७ च्या निवडणुकीत भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. यंदा सर्व ताकद, यंत्रणा आणि दोन पक्ष फोडूनही भाजपला केवळ ८९ जागांपर्यंतच मजल मारता आली. महापालिकेत स्वबळावर शतक गाठण्याचे भाजपचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. 'गावठी चाणक्यांनी' आखलेली व्युहरचना मुंबईत तरी पूर्णपणे यशस्वी होताना दिसली नाही, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गद्दारांना काय मिळालं?
या निवडणुकीत सर्वात मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'शाहसेने'ला बसला असल्याचे दिसते. ५३ माजी नगरसेवक आणि सत्ता हाती असूनही शिंदे गटाला केवळ २८ ते २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. "ज्या शिवसेनेचा महापौर आपल्या हाती होता, तो गमावला आणि भाजपच्या वळचणीला जाऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व धोक्यात घातले," असा सूर आता शिवसैनिकांमधून उमटत आहे. भाजपने केवळ शिंदेंचा वापर करून घेतला आणि अखेर त्यांना संपवले, हेच या निकालातून अधोरेखित होत आहे.

मुंबईत 'मराठी' कार्ड यशस्वी
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) यंदा ६ जागा जिंकत आपली उपस्थिती दाखवून दिली आहे. ठाकरे बंधूंनी भाजपविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईतील मराठी मतदारांनी त्यांना आदराचे स्थान दिले आहे.

प्रमुख पक्षांची आकडेवारी (अंदाजे):
 * भाजप: ८९ (२०१७ मध्ये ८२ होते)
 * शिवसेना (UBT): ६५
 * शिवसेना (शिंदे गट): २९ (बहुतेक माजी नगरसेवकांचा पराभव)
 * काँग्रेस: २४
 * मनसे: ०६

 थोडक्यात पण महत्त्वाचे:
"बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही," अशा शब्दांत विरोधकांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. २७ महापालिका जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला प्रत्यक्षात अनेक ठिकाणी स्थानिक पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. सत्तेच्या बळावर मुंबई जिंकली असली, तरी 'मुंबईकरांची मने' मात्र ठाकरेंनीच जिंकली आहेत, असे हे निकाल ओरडून सांगत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.