मुंबई, (प्रतिनिधी) २१ जुलै - मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना, विशेषतः अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारांना मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मुख्य मार्गावर धावणाऱ्या १२ डब्यांच्या १० उपनगरीय लोकल गाड्यांचे २० जुलैपासून १५ डब्यांच्या रेकमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
या निर्णयाचा थेट फायदा मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना मिळणारच आहे, शिवाय भविष्यात कसारा मार्गावरही १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. यामुळे दररोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नाशिककरांची गर्दीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.
नाशिककरांना कसा होणार फायदा?
नाशिक रोड स्थानकावरून मुंबईसाठी अनेक एक्स्प्रेस आणि मेल गाड्या उपलब्ध असल्या, तरी ऐनवेळी मिळणारे आरक्षण मिळवणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे नाशिकमधील अनेक नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगार नाशिक ते कसारा असा प्रवास करून तिथून लोकल पकडणे पसंत करतात.
मात्र, सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी कसारा स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये चढणे अत्यंत जिकिरीचे बनते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. जर कसारा मार्गावर १५ डब्यांची लोकल सेवा सुरू झाली, तर:
प्रत्येक फेरीत प्रवाशांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल.
स्थानकांनावरील आणि लोकल गाड्यांमधील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल.
नाशिक ते मुंबई प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरेल.
कसारा मार्गावरील विस्ताराची शक्यता बळावली
मुख्य मार्गावरील (अंबरनाथ, बदलापूर व कर्जत) लोकल गाड्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करणे हे भविष्यात कसारा मार्गावर या सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले आणि महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे मुंबई विमानतळाकडे जाणारे प्रवासी, उद्योग क्षेत्राशी संबंधित कामगार आणि विद्यार्थ्यांचा प्रवास येत्या काळात अधिक सुलभ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे