मसाज सुविधा, हिरकणी कक्ष अन् मोबाईल चार्जिंग... सरकारी निवारा केंद्रात वारकऱ्यांसाठी या आहेत सुविधा...

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

पंढरपूर, (प्रतिनिधी) २० जुलै - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने यंदा चोख आणि हायटेक व्यवस्था केली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन सर्व सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाने पुरवलेल्या या विविध सेवांबद्दल वारकरी समाजाने पूर्ण समाधान व्यक्त केले आहे.

या पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता, पालकमंत्री गोरे यांनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर कारुंडे बंगला येथील विसाव्याच्या ठिकाणी ते वारकऱ्यांसोबत पायी चालले. तेथे त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप व अन्य सोहळा प्रमुखांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच कार्यालयात व भोजन कक्षात जमिनीवर मांडी घालून वारकऱ्यांसमवेत महाप्रसाद घेतला.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात उतरले 'आरोग्यदूत' आणि 'वारीदूत'

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या विशेष संकल्पनेतून यंदा पालखी मार्गावर ‘मुख्यमंत्री आरोग्यदूत’, ‘मुख्यमंत्री वारीदूत’ आणि ‘मुख्यमंत्री जलदूत’ तैनात करण्यात आले आहेत.

जागेवरच उपचार: विशेष गणवेशातील 'आरोग्यदूत' मोटारसायकलवरून फिरून आवश्यक वैद्यकीय किटसह वारकऱ्यांना जागेवरच तातडीने उपचार देत आहेत.

पाणी आणि स्वच्छता: जलदूत आणि टँकर चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपअभियंता नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून, संपूर्ण मार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी चोख पार पाडली जात आहे.

निवारा केंद्र ठरले भाविकांचे हक्काचे विश्रामगृह

पालखी मार्गावर चालून थकलेल्या भाविकांना विसावा मिळावा यासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेले 'मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र' सध्या हाऊसफुल्ल झाले आहे. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळत असल्यामुळे हजारो वारकरी येथे विश्रांती घेत आहेत. या केंद्रांमध्ये थकलेल्या पायांसाठी विशेष मसाज सुविधा, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स आणि महिलांसाठी 'हिरकणी कक्ष' उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Advertisement

वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, ग्रामविकास विभागाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वारकऱ्यांना आणि सोहळा प्रमुखांना रेनकोट व महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

या सोहळ्यात सोहळा प्रमुखांच्या वतीने पालकमंत्री गोरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचेही स्वागत करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमावर आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार आणि संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंते बारीक लक्ष ठेवून आहेत.

पालखी मार्गावरील प्रमुख हायलाईट्स:

१० पालखी मार्ग: राज्यातील एकूण १० प्रमुख पालखी मार्गांवर ग्रामविकास विभागाच्या सुविधा लागू.

तातडीची मदत: फिरते मोटारसायकल रुग्णवाहिका पथक (आरोग्यदूत) वारकऱ्यांच्या सेवेत २४ तास सज्ज.

विशेष कक्ष: निवारा केंद्रात महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि मोबाईल चार्जिंगची मोफत सोय.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.