पुणे, (प्रतिनिधी) १९ जुलै - "क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाने आज संपूर्ण जगामध्ये एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. या तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाशी भारताला जोडण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी राज्य सरकार एक भक्कम आणि परिपूर्ण परिसंस्था (इकोसिस्टिम) निर्माण करणार आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित 'ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अँड फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूट'च्या स्थापनेसाठी भागधारकांसोबत आयोजित (Interaction with Stakeholders) विशेष चर्चासत्रात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, 'मित्रा' (MITRA) संस्थेचे दीपक करंजीकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह विविध औद्योगिक, शैक्षणिक आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा जागतिक वाटा १६ ट्रिलियन डॉलर्सवर जाणार
जागतिक पातळीवरील आकडेवारीचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले, "२०२४ मध्ये या तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावरील वाटा जवळपास २ ते ३ ट्रिलियन डॉलर्स होता, जो पुढील पाच वर्षांत सुमारे १६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मानवी इतिहासात आपण एवढी वेगवान वाढ कधीही पाहिलेली नाही. त्यामुळे भारताला या प्रवासाचा मुख्य भाग व्हावेच लागेल." संयुक्त राष्ट्रांच्या 'फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्स'मध्ये भारत सध्या ३६ व्या क्रमांकावर असला, तरी आपली गणना अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणारा देश म्हणून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
५ हजार तरुणांना प्रशिक्षण: 'मित्रा' संस्थेच्या माध्यमातून राज्यात क्वांटम कम्प्युटिंगच्या प्रशिक्षकांचा एक मोठा गट तयार केला जाणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत या क्षेत्रात किमान ५ हजार लोकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.
एमएसएमई (MSME) उद्योगांना बळ: सिलिकॉन, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उद्योग विश्वाचा चेहरा बदलत आहे. निधी आणि क्षमतेअभावी लहान व मध्यम (MSME) उद्योग मागे पडू नयेत, म्हणून त्यांना सहज उपलब्ध होतील असे 'स्मार्ट प्लॅटफॉर्म्स' सरकार विकसित करणार आहे.
टाटा समूहाच्या सोबतीने
'इनोव्हेशन सिटी': मुंबईमध्ये विकसित होत असलेल्या 'इनोव्हेशन सिटी'साठी राज्य शासनाने टाटा समूहाशी भागीदारी केली असून, या तंत्रज्ञान मोहिमेला त्या संकल्पनेशी जोडले जाईल.
धोरणांचे संस्थात्मकीकरण काळाची गरज!
"सध्या आपल्याकडे या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वैयक्तिक पातळीवर उत्तम काम सुरू आहे, पण ते विखुरलेले आहे. या प्रयत्नांचे संस्थात्मकीकरण (Institutionalization) केल्यास संपूर्ण चित्र बदलू शकते. केंद्र सरकारच्या योजनांशी सुसंगत राहून राज्य सरकार यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास पूर्णपणे तयार आहे."
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
?s=20