नांदेड, (प्रतिनिधी) १९ जुलै - नांदेड-मूदखेड मार्गावरील गोदावरी नदीत कार पाडून दोन मुलांसह शिक्षकाने आत्महत्या केल्याच्या घटनेला आता अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे. नदीत कार घालण्यापूर्वीच त्या निर्दयी पित्याने आपल्या दोन्ही निष्पाप मुलांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती, अशी धक्कादायक माहिती शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवालातून उघडकीस आली आहे. या वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी मृत शिक्षकाविरोधातच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले ४२ वर्षीय शिक्षक सुनील मोरे यांनी १६ जुलै रोजी सकाळी नांदेड-मूदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून आपली भरधाव कार थेट गोदावरी नदीत पाडली होती. या कारमध्ये त्यांची १४ वर्षांची मुलगी सारा आणि १० वर्षांचा मुलगा सुमेध हे दोघेही होते. सुरुवातीला हा घातपात किंवा मुलांसह एकत्रित आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला जात होता.
पोस्टमॉर्टम अहवालातून थरार उघड
परंतु, मुलांच्या शवविच्छेदन अहवालाने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे. डॉक्टरांच्या अहवालानुसार, सुनील मोरे यांनी कार नदीत लोटण्यापूर्वीच चाकूने सारा आणि सुमेध यांच्या छातीवर व पोटावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून त्यांनी कार गोदावरी नदीत पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी मृत सुनील मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
व्हॉट्सॲप स्टेटस ठरले महत्त्वाचा पुरावा; वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा
हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले होते, तसेच मित्रांच्या ग्रुपवर एक मेसेजही पाठवला होता. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण मुलांसह आयुष्य संपवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या मेसेजमध्ये केला होता.
या मेसेजमध्ये त्यांनी खालील ४ जणांच्या नावांचा थेट उल्लेख केला होता:
१. किशन फोले (गट शिक्षणाधिकारी)
२. सूर्यकांत बाचे (विस्तार अधिकारी)
३. शिवाजी कदम (केंद्रप्रमुख)
४. दत्ता पवळे (सहकारी शिक्षक)
पोलिसांकडून कसून तपास सुरू
मृत शिक्षकाच्या व्हॉट्सॲप मेसेज आणि कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी या चारही जणांवर ॲट्रॉसिटी (अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (कलम ३०६) गुन्हा दाखल केला आहे. एकाच वेळी मुलांची हत्या आणि अधिकाऱ्यांच्या जाचाचा अँगल समोर आल्यामुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अतिशय कसून तपास करत आहेत.