पंढरपूर, (प्रतिनिधी) १९ जुलै - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी लाडक्या विठ्ठलाच्या भक्तांची आणि वारकऱ्यांची अलोट गर्दी उसळू लागली आहे. अशा गजबजलेल्या वातावरणात व्हीआयपी (VIP) वाहनांच्या ताफ्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण प्रोटोकॉल बाजूला ठेवला. शासकीय विश्रामगृह ते पत्राशेड येथील दर्शन रांगेपर्यंत पालकमंत्र्यांनी स्वतः बुलेट चालवत धावता आढावा घेतला, तर त्यांच्या पाठीमागे सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वार झाले होते. पुढे दर्शन रांग ते वाळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बुलेटचे हँडल हाती घेत पाहणी पूर्ण केली.
पालकमंत्र्यांच्या या 'बुलेट स्टाईल' दौऱ्याची आणि साधेपणाची सध्या पंढरपुरात मोठी चर्चा रंगली आहे. या पाहणी दौऱ्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह प्रशासनाचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
दर्शन रांगेत वारकऱ्यांशी संवाद; पालकमंत्र्यांच्या हस्ते खिचडी वाटप
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रा शेडजवळील रिद्धी-सिद्धी दर्शन रांग, चंद्रभागेचे वाळवंट, विठ्ठल मंदिर परिसर आणि भक्तीसागर या प्रमुख ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
वारकऱ्यांकडून समाधान: दर्शन रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या भाविकांशी पालकमंत्र्यांनी थेट संवाद साधला आणि प्रशासकीय सुविधांबद्दल विचारपूस केली. यावेळी भाविकांनी व्यवस्थेबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केले.
अन्नदान: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत अन्नदानाची सोय करण्यात आली आहे. याची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी स्वतः विठ्ठलभक्तांना तांदळाच्या खिचडीचे वाटप केले.
शौचालये आणि वाळवंटात 'स्वच्छतेला' सर्वोच्च प्राधान्य
लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून पालकमंत्र्यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना स्वच्छतेबाबत कडक निर्देश दिले. दर्शन रांगेतील शौचालयांची नियमित स्वच्छता राखली जावी, यासाठी चोवीस तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच वाळवंट आणि भक्तीसागर परिसरात कचरा होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगत त्यांनी स्वतः स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढवले.
व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांचा वेळ वाचला!
"गेल्या दीड महिन्यांपासून सोलापूर जिल्हा प्रशासनाने आषाढी वारीची जय्यत तयारी केली असून, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज आहे. यावर्षी व्हीआयपी (VIP) दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे सामान्य भाविकांना दर्शनासाठी ७ ते ८ तास ताटकळत उभे राहावे लागायचे, तो वेळ आता कमालीचा कमी झाला आहे."
— जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर
?s=20