मनोहर शिंदे, (नाशिक) १८ जुलै - नाशिककरांसाठी पर्यटनाचे आणि वीकेंडचे हक्काचे ठिकाण असलेल्या दमण येथे 'नमो विमानतळ' (NAMO Airport) कार्यान्वित झाले असून, तेथून दिल्लीसाठीच्या पहिल्या थेट विमानाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी हिरवा झेंडा दाखवला. नाशिकहून रस्ते मार्गे अवघ्या चार तासांवर (१५३ किमी) असलेल्या दमणमध्ये विमानतळ सुरू झाल्यामुळे नाशिककरांना आणखी एक विमानतळ उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे, जगाच्या पाठीवर नाशिक हे एकमेव असे शहर ठरले आहे, ज्याच्या अवघ्या २०० किलोमीटरच्या परिघात आता तब्बल ७ विमानतळे उपलब्ध आहेत. सध्या नाशिक लगत ओझर (२० किमी), शिर्डी (९५ किमी), नवी मुंबई (१७६ किमी), मुंबई (१८० किमी), छत्रपती संभाजी नगर (१८६ किमी), पुणे (२११ किमी) आणि आता दमण (१५३ किमी) ही विमानतळे आहेत.
दिल्ली-दमण प्रवास अडीच तासांवर!
दमण येथील इंडियन कोस्ट गार्ड एअर स्टेशन (ICGAS) मधून हे दुहेरी उद्दिष्ट साधणारे नागरी टर्मिनल विकसित करण्यात आले आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने १२४ कोटी रुपये खर्चून हे अत्याधुनिक टर्मिनल उभारले आहे. या नवीन सेवेमुळे आता सुरत किंवा मुंबईमार्गे जाणारा ८ ते १० तासांचा वेळ वाचणार असून, दिल्ली ते दमण हे अंतर केवळ अडीच तासांवर आले आहे. अलायन्स एअर या सरकारी कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.
पर्यटन आणि उद्योगांना मोठी चालना
दमण, दीव आणि दादरा-नगर हवेली भागात ७ हजारांहून अधिक उद्योग आहेत, तर शेजारील वापी-वलसाडमध्ये १५ हजारांवर कारखाने आहेत. या विमानतळामुळे उद्योगांना गती मिळेल. तसेच दमणला दरवर्षी भेट देणाऱ्या २० लाख पर्यटकांच्या संख्येत आता मोठी वाढ होईल.
"पंतप्रधानांनी दमणच्या 'नील अर्थव्यवस्थेला' निळ्या आकाशातील संधींशी जोडले आहे. येथील मत्स्यव्यवसाय, सागरी उत्पादने आणि फार्मा उद्योगाला या हवाई संपर्कामुळे नवी चालना मिळेल."
— राम मोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री
विमानतळाची वैशिष्ट्ये आणि पुढील नियोजन:
क्षमता: ३,७०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले हे टर्मिनल वार्षिक ३.६७ लाख प्रवाशांची हाताळणी करू शकते.
विस्तार योजना: भविष्यात धावपट्टीचा विस्तार करून मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि पाटणा या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल, तसेच 'एअरबस A320' सारखी मोठी विमाने उतरवण्याची योजना आहे.
देशातील विकास: प्रादेशिक हवाई वाहतूक बळकट करण्यासाठी उडान योजनेला १० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून, २९,००० कोटी रुपयांच्या तरतुदीतून देशात १०० नवीन विमानतळ आणि २०० हेलिपॅड्स विकसित केले जातील.