नाशिक, (प्रतिनिधी) १६ जुलै - नाशिक शहरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याच कामांमुळे मध्यवर्ती ठिकाणच्या 'सीबीएस' (CBS) बसस्थानकावरून सुटणाऱ्या एसटी बसेस सध्या 'निमाणी' बसस्थानकावरून सोडल्या जात आहेत. मात्र, प्रवाशांच्या वाढलेल्या या गर्दीचा गैरफायदा आता चोरटे आणि गुन्हेगारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. बाहेरगावाहून आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला तीन जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत सुमारे ९२ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना निमाणी बसस्थानकात घडली आहे. या घटनेमुळे 'निमाणी परिसर सुरक्षित आहे का?' असा गंभीर प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
शौचालयाजवळ गाठून बेदम मारहाण
याप्रकरणी गजेंद्र युवराज सूर्यवंशी (वय २५, रा. दातीरनगर, अंबड, नाशिक) या तरुणाने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गजेंद्र हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. बुधवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमारास तो बाहेरगावाहून निमाणी बसस्थानकात परतला. बसस्थानक आवारातील सार्वजनिक शौचालयाजवळ तो उभा असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण तिथे आले.
जीवे मारण्याची धमकी देत सोनसाखळी अन् रोकड लांबवली
कुठलेही कारण नसताना या त्रिकुटाने गजेंद्रला अडवून आधी अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. "आरडाओरडा केला तर जीवे ठार मारू," अशी धमकी देत भामट्यांनी गजेंद्रच्या गळ्यातील १ तोळे वजनाची सोन्याची साखळी (किंमत अंदाजे ९० हजार रुपये), खिशातील पाकिटात असलेली २,१६० रुपयांची रोकड आणि वेगवेगळ्या बँकांची एटीएम कार्डे असा एकूण ९२,१६० रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. गुन्हा केल्यानंतर तिघेही दुचाकीवरून पसार झाले.
पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांचा शोध घेत आहेत.
निमाणी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने प्रवाशांमध्ये भीती
कुंभमेळ्याच्या कामांमुळे निमाणी बसस्थानकावर प्रवाशांची २४ तास मोठी वर्दळ असते. मात्र, रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशा पोलीस बंदोबस्ताचा अभाव असल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, पोलिसांनी निमाणी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.