पुणे, (प्रतिनिधी) १६ जुलै - मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि लाडकं जोडपं म्हणून ओळखले जाणारे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर अखेर कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खटके उडत असल्याच्या आणि ते वेगळे राहत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, आजवर या दोघांनीही या विषयावर मौन बाळगले होते. अखेर आज इन्स्टाग्रामवर एक संयुक्त पत्रक जाहीर करत आदिनाथ आणि उर्मिलाने आपल्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
'पती-पत्नी म्हणून प्रवास संपला, पण पालक म्हणून एकत्र'
आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आदिनाथ आणि उर्मिलाने लिहिले की,
"आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर… एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करणार आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील."
प्रायव्हसीचा आदर राखण्याची विनंती
आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी प्रसारमाध्यमांना आणि चाहत्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे. "आमच्या या कठीण प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही," असेही त्यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे.
'शुभमंगल सावधान'च्या सेटवर फुललेलं प्रेम
उर्मिला आणि आदिनाथ यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात महेश कोठारे दिग्दर्शित 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात उर्मिला मुख्य भूमिकेत होती, तर आदिनाथ वडील महेश कोठारे यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक (असिस्टंट डायरेक्टर) म्हणून काम करत होता. याच दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. अत्यंत थाटामाटात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. त्यांना 'जिजा' नावाची एक गोड मुलगी आहे, जिचा बारशाचा सोहळाही कमालीचा चर्चेत राहिला होता.
चर्चांना अखेर पूर्णविराम
गेल्या काही काळापासून आदिनाथ आणि उर्मिला सार्वजनिक ठिकाणी किंवा कौटुंबिक सोहळ्यांमध्ये एकत्र दिसत नव्हते. आदिनाथच्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनला किंवा कार्यक्रमाला उर्मिलाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता या दोघांनी स्वतःच पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला असून, अत्यंत सामंजस्याने आपला संसार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून वेगळे झाले असले तरी मुलगी जिजाच्या संगोपनासाठी ते सदैव पालक म्हणून एकत्र राहतील, या त्यांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुकही केले आहे.
?utm_source=ig_embed&utm_campaign=loading&sfnsn=wiwspwa