येवला शहराला होणार दररोज पाणीपुरवठा... मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेला मंजुरी...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

येवला, (प्रतिनिधी) १४ जुलै - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरासाठी साकारण्यात येत असलेल्या १६०.२५ कोटी रुपयांच्या येसगाव पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने अमृत २.० अभियानामधून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे येवला शहराला दररोज शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून येवला शहरातील २०५६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघून येवलेकरांना पिण्यासाठी दररोज मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.  

येवला शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नव्याने निर्माण झालेल्या नागरी वस्त्यांमुळे सध्याच्या पाणी पुरवठा योजनेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. पालखेड डावा कालव्यावरील साठवण तलाव आणि जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळेच शहरात सध्या ३ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अमृत २.० अभियानांतर्गत येसगाव उद्भवावरून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.

या योजनेला दि.८ मे २०२६ रोजी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली होती. त्यानंतर ही योजना केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली होती. दि.१८ जूनला केंद्र शासनाच्या शिखर समिती बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली होती.

दि.३ जुलैला अमृत २.० अभियान अंतर्गत गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठकीत या योजनेला मान्यता मिळाली होती. त्यानंतर आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अमृत २.० अभियान मधून या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याबाबत आदेश निर्गमित केले आहे.

या योजनेमुळे येवला शहराचा पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न मार्गी लागणार आहे. सन २०५६ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ही योजना साकारली जाणार आहे. या योजनेमुळे येवलेकरांना दररोज पुरेसे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी जलसंपदा विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी नांदूरमधमेश्वर गोदावरी डावा कालव्यामधून येसगाव ता. कोपरगाव येथून वाढीव पाणी आरक्षण सुद्धा मंजूर केले आहे. 

अशी आहे योजना -

येवला नगरपालिकेची मालकी असलेल्या येसगाव येथील ३.५५ हेक्टर जागेत ३०० दक्षलक्ष लीटर क्षमतेचा आरसीसी साठवण तलाव बांधण्यात येईल. त्यात गोदावरी कालव्यामधून जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाईल. ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रात येईल. नूतनीकरण केलेल्या या केंद्रामध्ये पाणी शुद्ध होईल. या केंद्रातून पंपिंग मशिनरीद्वारे उर्ध्ववाहिनीमधून उंच जलकुंभात पाणी आणण्याचे नियोजन आहे. नववसाहतींसह शहराच्या सर्वच भागात दररोज पुरेसे पाणी पुरवण्याचे निश्चित आहे.

योजनेची वैशिष्ट्ये.....

- येसगाव साठवण तलाव क्षमता – ३०० दशलक्ष लिटर

- उपसा विहीर व पाणी दाबनलिका (येसगाव ते येवला) - १२.८२ किमी

- जलशुद्धीकरण केंद्र – ७ दशलक्ष लिटर

- शुद्ध जलवाहिनी – ४.३९ किलोमीटर

- उंच साठवण टाक्या – एकूण ३  

Advertisement

(तहसीलरोड – १२.६० लक्ष लीटर, विंचूररोड –६.७० लक्ष लिटर, बदापूररोड–१.९० लक्ष लिटर)

 - वितरण व्यवस्था – ९७.१६ किलोमीटर

 - नादुरुस्त जलवाहिन्या बदलल्या जाणार

 - पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा

 - सौर ऊर्जेवरील प्रकल्प

असा होईल दैनंदिन पाणी पुरवठा.....

२०२८ पर्यंत  -   १३.६२० दशलक्षलिटर

२०४३ पर्यंत  -   १६.७१० दशलक्ष लिटर

२०५८ पर्यंत  -   २०.३९० दशलक्ष लिटर

 

प्रतिक्रिया

येवला शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा शब्द मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला होता. त्यानुसार राज्य शासनाकडे १६०.२५ कोटी रुपयांच्या येसगाव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेला राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होईल. या योजनेमुळे येवला शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.

- माजी खासदार समीर भुजबळ

Advertisement

Comments

No comments yet.