महिला वारकऱ्यांचा अपघात होताच हे तिन्ही मंत्री फिल्डवर... अधिकारी, कर्मचारीही...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) १४ जुलै - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारी सोहळ्यावर आणि सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी भगिनींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. राजश्री शंकर भोसले (वय ६२), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली.

२. माधवी राजाराम सरवडे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली.

३. नंदा बाबुराव पवार (वय ५२), रा. डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.

मृतकांच्या वारसांना ५ लाखांची मदत; मोफत उपचारांचे निर्देश

या भीषण अपघाताची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, "जिल्हा स्तरावरील सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव त्वरित पाठवावा." अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या वतीने केला जाणार आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची रुग्णालयात धाव

घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या: "ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. जखमी वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे."

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश: त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि माऊली संस्थेचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते.

नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. आषाढी वारीमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि अल्पवयीन वाहनचालक वाहने चालवत असतील, तर त्यांची कसून तपासणी करण्यात यावी. वारी मार्गावर एकही नियमबाह्य वाहन चालणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने वाहने चालवून पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची सामूहिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.