दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १३ जुलै - "केंद्र शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी, पारदर्शक आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करावी. शेतकऱ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे," असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आजपासून 'दिशा' समितीच्या दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीचे सचिव तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या आढावा प्रक्रियेत संबंधित विभागांना आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीस समितीचे अध्यक्ष खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, महापौर हिमगौरी आडके, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषी क्षेत्रातील योजनांचा कसून आढावा
बैठकीच्या पहिल्या दिवशी कृषी विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजना, परंपरागत कृषी विकास योजना, मृदा आरोग्य पत्रिका, ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम), प्रधानमंत्री फसल विमा योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, किसान कॉल सेंटर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि 'पीएम-किसान' यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
लोकप्रतिनिधींच्या प्रमुख सूचना व निर्देश:
माती परीक्षण व सेंद्रिय शेती: जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पीकनिहाय मातीचा नमुना घेऊन पीकसुधारणेसाठी कसून परीक्षण करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना जैविक व सेंद्रीय खतांच्या वापरासाठी विशेष प्रोत्साहन देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.
'ई-नाम' (E-NAM) चा विस्तार: 'ई-नाम' योजनेचा लाभ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावा, यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी.
अभ्यास दौऱ्यात महिलांना संधी: 'आत्मा' (ATMA) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या परदेश व परराज्य अभ्यास दौऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रयोगशील शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही आवर्जून समावेश करण्यात यावा.
पारदर्शक अंमलबजावणीवर भर
बैठकीत प्रत्येक विभागाकडून योजनानिहाय निधी खर्च, लाभार्थ्यांची सद्यस्थिती आणि अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींची माहिती सादर करण्यात आली. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याचे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि खासदार भास्कर भगरे यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत उर्वरित विभागांच्या योजनांचाही आढावा घेतला जाणार आहे.