बीड, (प्रतिनिधी) १३ जुलै - "निसर्गाच्या लहरीपणामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पाऊस नसल्याने पिके तर गेलीच, पण आता मुलांची लग्नंही जमेनाशी झाली आहेत," अशी उद्विग्न व्यथा आष्टी येथील शेतकरी अशोक माने यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे फोनवरून मांडली. गेल्या तीन दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेर रविवारी या शेतकऱ्याचा कृषी मंत्र्यांशी संपर्क झाला, ज्यामध्ये त्यांनी अटी-शर्तींविना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.
अटी-शर्तींविना सरसकट कर्जमाफी द्या; शेतकऱ्याची मागणी
आष्टी भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अशोक माने यांनी मंत्र्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, या संकटामुळे आता ग्रामीण भागात गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने अटी-शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक न करता, त्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
आम्ही ४० हजार कोटींची कर्जमाफी केली; कृषी मंत्र्यांचे स्पष्टीकरण
शेतकऱ्याच्या या मागणीवर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारची बाजू मांडली. "सरकारने अत्यंत अडचणीच्या काळात ४० हजार कोटी रुपयांची मोठी आणि चांगली कर्जमाफी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. समोर कोणतीही निवडणूक नसतानाही सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे," असे भरणे म्हणाले.
"मी देखील एक शेतकरी आहे..."
संवाद संपवताना कृषी मंत्री भरणे यांनी सहभागाची भावना व्यक्त केली. "या निर्णयाने सर्वच शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान होणार नाही याची मला कल्पना आहे, कारण शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत आणि मी स्वतः देखील एक शेतकरी आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नियमित कर्ज भरणारे शेतकरीही आता 'रडार'वर; २ लाखांपर्यंत अनुदान
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, त्यांना आतापर्यंत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. मात्र, आता अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना देखील २ लाखांपर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.