राज्यात तीन वर्षांत उभारणार १४५ उड्डाणपूल... मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा... बघा, तुमच्या भागात कुठे होणार?

Share:
Main Image
Last updated: 13-Jul-2026

नागपूर, (प्रतिनिधी) १३ जुलै - राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच, रेल्वे फाटकांमुळे होणारे अपघात कायमचे रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा संकल्प केला आहे. येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या (ROB) बांधकामाला प्राधान्य देऊन संपूर्ण महाराष्ट्र 'रेल्वे फाटकमुक्त' करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

नागपूरमधील वर्धमाननगर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी रस्ता उड्डाण पुलासह राज्यातील एकूण ४८४ कोटी रुपये खर्चाच्या ९ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (महारेल) ने हे प्रकल्प विकसित केले आहेत.

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास प्राधान्य

लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी सुमारे २१ हजार लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळेच राज्य सरकारने रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात एकूण ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, त्यापैकी १० हजारांपेक्षा जास्त दळणवळण असलेल्या १२१ फाटकांसह इतरही १४५ पुलांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. 'महारेल'च्या स्थापनेमुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि रेल्वे प्रकल्पांना मोठी गती मिळाली आहे, असा गौरवही मुख्यमंत्र्यांनी केला.

नागपुरात पायाभूत सुविधांचे जाळे

नागपूर आणि मुंबईतील अतिशय कठीण पुलांची कामे महारेलने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वेळेत पूर्ण केली आहेत. नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, औद्योगिक विकास आणि मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असून शहराचा आर्थिक चेहरामोहरा बदलत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दरम्यान, भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.

पारडी येथे आधुनिक भाजी मार्केट व स्पोर्ट्स क्लब: नितीन गडकरी

अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाची नवी रूपरेषा मांडली. पारडी येथील उड्डाण पुलासोबतच स्थानिक व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट आणि स्पोर्ट्स क्लब बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या १५० कोटींच्या प्रकल्पासाठी 'एनएचएआय' (NHAI) कडून ४० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. तसेच पूर्व नागपुरात कचऱ्यापासून सीएनजी (CNG) निर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

'महारेल'चे राज्यातील ९ प्रकल्प एका नजरेत:

महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त/लोकार्पण करण्यात आलेल्या ४८४ कोटींच्या प्रकल्पांमध्ये खालील सुविधांचा समावेश आहे:

४ रोड ओव्हरब्रिज (ROB)

४ सबवे (Subways)

१ रोड अंडरब्रिज (Underpass)

हे प्रकल्प अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूर्ण झाले आहेत. यातील नागपूरचे दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधीतून, तर उर्वरित ७ प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या ५०:५० टक्के खर्च विभागणीच्या तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहेत.

या सोहळ्याला महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जितेंद्रकुमार शर्मा यांनी केले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.