येथे सुरू होणार इलेक्ट्रिक बोट निर्मिती कारखाना... शेकडो तरुणांना मिळणार रोजगार...

Share:
Main Image
Last updated: 12-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १२ जुलै - राज्यातील सागरी वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलयाने (व्हेसल्स) उपलब्ध करून देण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशातील आघाडीचा जहाजबांधणी प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यासाठी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे कोकणच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला (ब्लू इकॉनॉमी) मोठी गती मिळणार आहे.

सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; हरित क्रांतीचे पाऊल

या करारांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तालवणे येथे सुमारे २२ एकर जागेवर तब्बल १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा अत्याधुनिक कारखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात 'हरित सागरी वाहतुकीला' (Green Marine Transport) मोठी चालना मिळणार असून, जहाजबांधणी क्षेत्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

स्थानिक युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी

या प्रसंगी बोलताना बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सागरी क्षेत्रात मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करत आहे. मुंबई वॉटर मेट्रोसाठी अत्याधुनिक बोटींची निर्मिती आता महाराष्ट्रातच होणार आहे. सिंधुदुर्गातील या इलेक्ट्रिक बोट कारखान्यामुळे स्थानिक पातळीवर केवळ आधुनिक जहाजबांधणीला चालना मिळणार नाही, तर कोकणातील शेकडो सुशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होतील."

बैठकीत 'अंमलबजावणी' आराखड्यावर चर्चा

मंत्रालयात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आराखडा, आर्थिक गुंतवणूक, तांत्रिक सहकार्य आणि भविष्यातील सागरी उद्योगवृद्धीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. किनारपट्टी भागात पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

या बैठकीला परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच मे. झोया मरीन सर्व्हिसेसचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवाढीया, अंबर आयंदे आणि डॉ. निलेश बानवलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पाचे नाव: मुंबई वॉटर मेट्रो व्हेसल्स पुरवठा व इलेक्ट्रिक बोट निर्मिती कारखाना.

एकूण गुंतवणूक: सुमारे १५० कोटी रुपये.

प्रकल्प स्थळ: तालवणे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग (२२ एकर जागा).

प्रमुख उद्दिष्ट: मुंबई वॉटर मेट्रोला पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक जलयाने पुरवणे आणि कोकणात हरित जलवाहतुकीचा पाया रचणे.

फायदा: स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि जहाजबांधणीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.