नाशिकमध्ये रस्ते-वाहतूक, तर त्र्यंबकेश्वरमध्ये घाटांची पाहणी... सिंहस्थातील पावसाळी आव्हानांसाठी प्रशासनाची मोठी मोहीम...

Share:
Main Image
Last updated: 10-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १० जुलै - पुढील वर्षी (२०२७) नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने, मुसळधार पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा सामना करण्यासाठी प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रत्यक्ष पावसाळ्यात परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी दोन्ही शहरांमध्ये व्यापक पाहणी मोहीम राबवली. या मोहिमेत वाहतूक, जलनिस्सारण, साधूग्राम, घाट परिसर, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित त्रुटी व आव्हानांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

त्र्यंबकेश्वरमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून पाहणी

मंगळवारी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधूग्राम, गोदावरी घाट परिसर आणि महत्त्वाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी, पावसाळ्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि जलनिस्सारण व्यवस्थेची क्षमता तपासून घेण्यात आली.

महत्त्वाचे निर्णय व सूचना:

साधू-महंत आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन स्थलांतर मार्ग निश्चित करणे.

साधूग्राम परिसराची उपयुक्तता वाढवण्यासाठी अतिरिक्त नाले, पंपिंग व्यवस्था आणि भूसपाटी (Leveling) उंचावणे.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या घाटांच्या कामांची पूरस्थितीच्या दृष्टीने चाचपणी करणे व सुरक्षेच्या उपाययोजना करणे.

नाशिक शहरात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा रस्त्यावर

बुधवारी कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपजिल्हाधिकारी मीनाक्षी राठोड, मुख्याधिकारी अमोल चौधरी तसेच तहसीलदार मकरंद दिवाकर आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक शहरातील प्रमुख रस्ते, चौक, रेल्वे स्थानक परिसर आणि कुंभमेळा मार्गांची पाहणी केली.

या पाहणीत प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले:

Advertisement

वाहतूक व रस्ते: पावसामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम, पाणी साचणारी ठिकाणे (Waterlogging Points) आणि वाहतूक कोंडीचे 'बॉटलनेक' शोधणे.

पाण्याचा निचरा: नाले, कल्व्हर्ट आणि रस्त्यांवरील आऊटफॉलची कार्यक्षमता तपासणे.

गोदावरी घाट: नदीची वाढणारी जलपातळी, घाटांवरील घसरडी ठिकाणे आणि गर्दीच्या वेळी रांग व्यवस्थापन तसेच आपत्कालीन सुटका मार्ग.

सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता: तात्पुरत्या स्वच्छतागृहांसाठी पूरप्रवण क्षेत्र टाळणे, सांडपाण्याचा उलटा प्रवाह रोखणे आणि डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेणे.

प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र कृती आराखडा!

या सर्व पाहणी दौऱ्यातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे प्रत्येक संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणासाठी स्वतंत्र कृती आराखडा (Action Plan) तयार केला जाणार आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि भाविकांना सुरक्षित व अखंड सुविधा देणे हे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया:

"सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्यामुळे प्रत्यक्ष पावसाळ्यातच विविध ठिकाणांची पाहणी करून संभाव्य अडचणींची ओळख करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदाच्या पावसाळ्यातील प्रत्येक निरीक्षणाचा उपयोग पुढील वर्षीच्या सिंहस्थ नियोजनासाठी केला जाईल. भाविक, साधू-महंत आणि नागरिकांसाठी सुरक्षित, सक्षम आणि सुरळीत कुंभमेळा आयोजित करण्यासाठी प्राधिकरण कटिबद्ध आहे."

— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.