मुंबई, (प्रतिनिधी) ९ जुलै - नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित असलेल्या बाह्य रिंगरोड (Outer Ring Road) प्रकल्पाच्या अलाइनमेंटमध्ये झालेल्या बदलांची आता उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरातील रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये काही विशिष्ट व्यक्तींना किंवा विकासकांना आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी बदल करण्यात आला आहे का? याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
वडेट्टीवार यांच्या प्रश्नावर सरकारची मोठी घोषणा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये वारंवार झालेल्या बदलांविषयी विधानसभेत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार सरोज अहिरे यांनीही सहभाग घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी चौकशी समितीची घोषणा केली.
अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर मुख्य सचिवांच्या (Additional Chief Secretary) अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये आतापर्यंत तीन वेळा करण्यात आलेल्या बदलांची ही समिती सखोल तपासणी करेल.
याशिवाय, अलाइनमेंट बदल होणार याची पूर्वकल्पना घेऊन काही भूमाफियांनी किंवा व्यक्तींनी आधीच शेतकऱ्यांकडून स्वस्तात जमिनी खरेदी केल्या आहेत का? किंवा जमीन देण्याच्या प्रक्रियेत काही भ्रष्टाचार झाला आहे का? याचीही चौकशी केली जाईल आणि गुन्हेगारांवर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करणार
"हा रिंगरोड भविष्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आणि नाशिकच्या वाहतूक कोंडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. मात्र, तो राबविताना शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची शासन पूर्ण दक्षता घेईल," असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. शक्य तितके कमी भूसंपादन करून आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य व समाधानकारक मोबदला देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मोजणीच्या वेळी मातोरी आणि मुंगसरे भागात स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट व अन्य संरक्षक साहित्याचा वापर केला होता, अशी माहितीही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना दिली.