दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ८ जुलै - संकट कोणतेही असो, केवळ आदेश न सोडता स्वतः घटनास्थळी धावून जाणे ही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यशैलीची ओळख मानली जाते. गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा घेत असताना घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी त्यांच्या या 'संकटमोचक' प्रतिमेची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. मंत्री महाजन यांनी एकाच दिवशी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कौतुकाचा विषय ठरत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतः हाती घेतले पोलिसांच्या गाडीचे स्टेअरिंग
त्र्यंबकेश्वर भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आले होते. पाहणी सुरू असतानाच प्रशासकीय ताफ्यातील पोलिसांचे एक वाहन चिखलात वाईट पद्धतीने रुतले. वाहन बाहेर काढण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत असताना, परिस्थिती पाहून मंत्री महाजन यांनी कोणताही प्रोटोकॉल किंवा औपचारिकपणा न बाळगता थेट गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. त्यांनी स्वतः गाडी चालवून आणि उपस्थित अधिकारी व नागरिकांच्या मदतीने ते वाहन चिखलाबाहेर काढले. राज्याचा एक वरिष्ठ मंत्री पदाचा बडेजाव बाजूला ठेवून चिखलात उतरल्याचे पाहून उपस्थित कर्मचारी आणि नागरिक अचंबित झाले.
मुसळधार पावसात महामार्गावर थांबवला ताफा; अपघातग्रस्त कुटुंबाला वाचवले
हाच दौरा आटोपून रात्री १० वाजेच्या सुमारास मंत्री महाजन पालघरवरून मुंबईकडे परतत होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर गावाजवळील उड्डाणपुलावर मुसळधार पावसात एक भीषण अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नालासोपारा येथील पांचाळ कुटुंबाची 'स्विफ्ट डिझायर' कार एका ट्रकला धडकून पुढील भागात अडकली होती आणि काही अंतर फरफटत गेली होती. कारमध्ये तीन महिला, एक लहान मूल आणि एक पुरुष अडकले होते.
पावसात स्वतः उतरले रस्त्यावर:
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री महाजन यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला आणि स्वतः मुसळधार पावसात रस्त्यावर उतरले. त्यांनी उपस्थित नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेली कार सुरक्षितपणे बाजूला काढली. घाबरलेल्या पांचाळ कुटुंबाला धीर देऊन त्यांना पोलीस संरक्षणात सुरक्षित ठिकाणी हलवले. तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बंद पडलेला ट्रक बाजूला करण्याचे निर्देश हायवे प्रशासनाला दिले. आपल्या मदतीला थेट राज्याचे मंत्री धावून आले आहेत हे समजताच पांचाळ कुटुंबाने अत्यंत भावूक होत कृतज्ञता व्यक्त केली.
आदेश देणारे नव्हे, तर कृती करणारे 'संकटमोचक'
राज्यात कुठेही पूर, अतिवृष्टी, भूस्खलन किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की गिरीश महाजन हे नेहमीच प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करताना दिसतात. संकटाच्या वेळी केवळ वातानुकूलित केबिनमध्ये बसून आदेश देण्याऐवजी स्वतः पुढे होऊन जबाबदारी स्वीकारण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळेच राज्यभरात त्यांची ओळख 'संकटमोचक' म्हणून दृढ झाली आहे. मनोर आणि त्र्यंबकेश्वरमधील या दोन घटना प्रशासकीय फाईलमध्ये कदाचित छोट्या असतील, पण संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांसाठी वेळेवर मिळालेला हा आधार खूप मोठा ठरला आहे.