नाशिकला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा... या तालुक्यांमधील शाळा, कॉलेज बंद राहणार... पर्यटनस्थळांवरही नो एन्ट्री...

Share:
Main Image
Last updated: 08-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ८ जुलै - नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि शेजारील गुजरात राज्यात सुरू असलेला पाऊस लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण आणि कळवण या सहा तालुक्यांतील शाळांना गुरुवारी (९ जुलै) सुटी जाहीर केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी आपत्कालीन बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे आणि धबधबे रविवारपर्यंत (१२ जुलै) पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले असून तेथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गोदावरीला पूर; नांदूर मधमेश्वरमधून १५ हजार क्युसेक विसर्ग

गंगापूर आणि इतर धरण क्षेत्रातील संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १५ हजार २४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना जनावरे व साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

थरारक बचावकार्य: बेटावर अडकलेल्या ५ जणांना 'आपदा मित्रां'नी वाचवले!

सिन्नर हायवेनजीक असलेल्या नांदूर मधमेश्वर येथील एका बेटावर पाण्याचा वेढा वाढल्यामुळे ५ नागरिक अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक 'आपदा मित्र' तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शोध मोहीम राबवून सर्व ५ व्यक्तींना सुखरूप आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, नांदूर मध्यमेश्वर - खानगाव थडी (सिन्नर हायवे) पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग पोलिसांच्या साहाय्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

 मंत्री गिरीश महाजन आणि विभागीय आयुक्तांकडून पूरपरिस्थितीची पाहणी

Advertisement

मंत्री गिरीश महाजन यांची रामकुंडावर पाहणी: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दुपारी नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. "नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पावसाळी पर्यटन पूर्णपणे टाळावे," असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होत्या.

विभागीय आयुक्तांची नियंत्रण कक्षाला भेट: विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन प्रत्येक घटनेवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी होळकर पूल आणि पिंपळगाव बहुला येथील भूस्खलनग्रस्त रस्त्याची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी उपस्थित होते.

?s=20

प्रशासनाचा २४ तास सज्जतेचा आदेश:

"जिल्ह्यातील पावसाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी २४ तास सज्ज राहावे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे."

— डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.