इगतपुरी, (प्रतिनिधी) ८ जुलै - खालची पेठ भागात रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून चोरट्यांनी रोकडसह सुमारे सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहप्रवासी म्हणून बसलेल्या भामट्यांनी गर्दीचा फायदा घेत हा डल्ला मारल्याचा संशय असून, याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नाना साळवे (रा. लक्झरी वास्तू अपार्टमेंट, तळेगाव रोड, इगतपुरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
किराणा खरेदी करून परतताना घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली साळवे या सोमवारी (दि. ६) घरचा किराणा माल खरेदी करण्यासाठी घोटी येथे गेल्या होत्या. बाजार आटोपून त्या इगतपुरीकडे येण्यासाठी इतर प्रवासी बसलेल्या एका रिक्षामध्ये बसल्या. या प्रवासादरम्यान रिक्षातील अज्ञात चोरट्यांनी साळवे यांचे लक्ष विचलित करून, त्यांच्या किराणा साहित्याने भरलेल्या पिशवीत ठेवलेले मिनी पाकीट अत्यंत चालाखीने चोरून नेले.
चहाच्या टपरीजवळ उतरल्यावर चोरी उघड
रिक्षा इगतपुरी येथील खालच्या पेठ भागातील 'तानाजी चहाच्या टपरीजवळ' आली असता साळवे रिक्षातून उतरल्या. त्यानंतर त्यांनी पिशवी तपासली असता, त्यात ठेवलेले पाकीट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटात ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुमके आणि १५०० रुपयांची रोकड असा एकूण सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज होता.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच साळवे यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या चोरीच्या घटनेमुळे रिक्षातील सहप्रवासी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार परदेशी करत आहेत.