पावसाचा 'भोवरा' सरकला... नाशिकला दिलासा की अलर्ट? राज्यासाठी आजचा असा आहे हवामान इशारा...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जुलै - महाराष्ट्रभरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या तांडवामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी परिसरात 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना सर्वोच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक, त्र्यंबकेश्वरसाठी मोठी दिलासादायक बातमी!

नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने जाहीर केली आहे. काल पालघरमध्ये तब्बल ४५० मिमी पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर-नाशिकच्या मार्गे जाण्याची शक्यता असलेला पावसाचा तीव्र 'भोवरा' (Vortex) आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) परिसराकडे सरकला आहे. घाटमाथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस सुरू असला, तरी नाशिकमधील एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात आणि समाधानकारक आहे.

प्रादेशिक पूर आणि पावसाची सद्यस्थिती:

नाशिक जिल्हा (इगतपुरी, मालेगाव): इगतपुरीत पहाटेपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. नाशिक शहर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागात अजूनही ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट कायम आहे. दुसरीकडे, चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मालेगावच्या गिरणा नदीला मोठा पूर आला असून नदी दुथळी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, मालेगाव शहरात अद्याप दमदार पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

Advertisement

मुंबई व ठाणे परिसर: मुंबईत सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी वादळी वाऱ्यासह पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' कायम आहे. मुंबईची मिठी नदी पूर्णतः भरली असून प्रशासनाचे यावर बारीक लक्ष आहे.

पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर व सातारा): कोल्हापूर जिल्ह्यात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाशर्वाभूमीवर पंचगंगा नदीची पातळी ३५ फुटांवर पोहोचली असून नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. शिवाजी पूल परिसरात नदीचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी या पाच तालुक्यांमध्ये डोंगरदऱ्यांमधून पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढला आहे.

विदर्भ आणि गोंदिया: विदर्भातील अकोला आणि अमरावतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) अंदाज आहे. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात नदीला आलेल्या अचानक पुरात पिपरिया-रिसेवाडा मार्गावर एक टिप्पर व काही वाहने अडकली; सुदैवाने जीवितहानी टळली.

मराठवाडा व बीड: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव या भागात हलका ते मध्यम पाऊस आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस झाला असून गेल्या २४ तासांत २.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीडला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश भागात पूरपरिस्थिती नियंत्रणात असून आपत्कालीन पथके पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.