मनोहर शिंदे, (नाशिक) ७ जुलै - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागांत काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात संभाव्य ढगफुटीचा धोका आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन काल रात्रीच मुंबईहून नाशिककडे रवाना झाले. त्यांनी रात्रीच्या वेळीच अतिवृष्टी होत असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागाचा प्रत्यक्ष दौरा करून प्रशासकीय सज्जतेचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्हा प्रशासन पूर्णपणे 'अॅलर्ट मोड'वर आहे. त्र्यंबकेश्वर येथील संभाव्य ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनीही त्र्यंबकेश्वर परिसराला भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली.
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मध्यरात्री पाहणी
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील विविध सखल व संवेदनशील भागांना भेटी दिल्या. ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, तेथून पाण्याचा निचरा करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबई-नाशिक महामार्गावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. अतिवृष्टीचा संभाव्य धोका असलेल्या भागातून काही नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील करण्यात येत असून, प्रशासनाने त्यांची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.
या दौऱ्यात इगतपुरी येथे तहसीलदार अभिजीत बारवकर, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर त्र्यंबकेश्वर येथे तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
कादवा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा; पालखेड धरण भरण्याच्या मार्गावर!
दरम्यान, पालखेड पाटबंधारे उपविभागाच्या वतीने कादवा नदीकाठच्या नागरिकांसाठी 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा आणि धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे पालखेड धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
धरणाच्या वरच्या भागातून (उर्ध्व भागातून) येणारी पाण्याची प्रचंड आवक पाहता, जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवरील निर्णयानुसार पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे.
नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचे आवाहन:
नदीपात्रात उतरू नका: कादवा नदीच्या प्रवाहात किंवा परिसरात नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये.
साहित्य सुरक्षित स्थळी हलवा: नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले पशुधन (नावरे), शेतीचे मोटार पंप आणि इतर महत्त्वाच्या चीजवस्तू तातडीने सुरक्षित आणि उंचावरील ठिकाणी हलवाव्यात.
यंत्रणा सज्ज: संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आणि ग्रामपंचायतींनी आपापल्या भागात चोवीस तास दक्षता बाळगावी, असे निर्देश सहाय्यक कार्यकारी अभियंता (पालखेड पाटबंधारे उपविभाग, पिंपळगाव ब.) यांनी दिले आहेत.