आषाढी वारीत प्रथमच सेवा देणार ही ॲम्ब्युलन्स... आरोग्य विभागाचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 06-Jul-2026

पंढरपूर, (प्रतिनिधी) ६ जुलै - यंदाची आषाढी वारी वारकरी भाविकांसाठी अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने एक क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावर किंवा गर्दीत एखादा वारकरी गंभीर आजारी पडल्यास, त्याला तातडीने उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी वारीच्या इतिहासात प्रथमच ‘एअर ॲम्बुलन्स’ (हवाई रुग्णवाहिका) तैनात केली जाणार आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सर्वंकष नियोजनाचा आढावा घेतला.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, "यंदाच्या वारीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गंभीर रुग्णांना कमीत कमी वेळेत मोठ्या आणि विशेष रुग्णालयात हलविण्यासाठी एअर ॲम्बुलन्सची मदत घेतली जाईल. याशिवाय, वारीतील गर्दीच्या ठिकाणी अरुंद रस्त्यांवरून जलद पोहोचण्यासाठी 'बाईक ॲम्बुलन्स', आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील."

'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' डिजिटल उपक्रम

यंदा वारीमध्ये ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आणि ‘आरोग्यसंपन्न वारी’ हे विशेष डिजिटल उपक्रम राबवले जाणार आहेत. या माध्यमातून पालखी मार्गावरच भाविकांना आरोग्यविषयक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि 'आशा' सेविकेमार्फत (Asha Workers) आजार प्रतिबंधक उपाययोजना आणि आवश्यक औषधोपचार सेवा थेट भाविकांच्या चरणाशी पोहोचविल्या जाणार आहेत.

घरापासून ते पंढरीपर्यंत... बळीराजाची काळजी!

Advertisement

"वारकरी घरातून वारीसाठी प्रस्थान केल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याचे व्यापक नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर हलगर्जीपणा न करता तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

- प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री

प्रशासनाचे नियोजन अंतिम टप्प्यात

बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (NHM) संचालक संजय काटकर यांनी वारीसाठीच्या आरोग्य आराखड्याचे सादरीकरण केले. पालखी मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, मुबलक औषधसाठा, रुग्णवाहिकांची तैनाती, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था (Emergency Response) आणि डॉक्टरांच्या मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे यांच्यासह पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ प्रशासकीय व आरोग्य अधिकारी प्रत्यक्ष आणि व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून उपस्थित होते. यंदाची आषाढी वारी केवळ भक्तीचा नव्हे, तर अत्याधुनिक आरोग्य व्यवस्थापनाचा एक नवा आदर्श ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.