मुंबई, (प्रतिनिधी) ५ जुलै - शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी केलेल्या पक्षांतरामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका आणि विविध आरोप केले जात आहेत. या सर्व राजकीय टीकेला आणि आरोपांना आता त्यांच्या कन्या किरण सचिन अहिर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे अत्यंत भावनिक, तरीही तितक्याच सडेतोड शब्दांत उत्तर दिले आहे. "माझ्या वडिलांना पक्षाने भरपूर काही दिले, तरी त्यांनी पक्ष का बदलला? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, पदे ही कोणाची मेहेरबानी म्हणून मिळत नाहीत, ती कष्टाने आणि कर्तृत्वाने कमवावी लागतात," अशा स्पष्ट शब्दांत किरण यांनी आपल्या वडिलांची बाजू मांडली आहे.
किरण अहिर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या वडिलांबद्दल अनेक आरोप आणि द्वेषयुक्त संदेश मी पाहत आहे. आज मी येथे कोणाशीही वाद घालण्यासाठी आलेली नाही. मी फक्त एक मुलगी म्हणून, लहानपणापासून ज्या माणसाला अत्यंत जवळून पाहिले आहे, त्या वडिलांबद्दलचा माझा दृष्टिकोन मांडत आहे."
नातं दोन्ही बाजूंनी असतं; कर्तृत्वाची पावती!
'जर त्यांना आधीच इतके काही दिले गेले होते, तर त्यांनी पक्ष का बदलला?' या प्रश्नाला उत्तर देताना किरण यांनी राजकारणाचा खरा हेतू पद नसून जनतेची सेवा हा असल्याचे अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, "अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले, मी या गोष्टीचा पूर्ण आदर करते. पण जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसते, त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कठोर परिश्रम केले नसते, तर त्यांच्यावर एवढ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या असत्या का? प्रत्येक नातं हे दोन्ही बाजूंनी असतं. ज्याप्रमाणे पक्षाने माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला, त्याचप्रमाणे त्यांनीही सोपवलेली प्रत्येक जबाबदारी अतोनात कष्ट करून पूर्ण केली."
२०१९ मधील वरळीच्या त्यागाचा उल्लेख
सचिन अहिर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देत किरण म्हणाल्या, "२०१९ मध्ये माझ्या वडिलांनी वरळीतील आपल्या स्वतःच्या राजकीय दाव्याचा त्याग करून आदित्य ठाकरे यांच्यासाठी पूर्ण निष्ठेने काम केले, हे प्रत्येकाला माहीत आहे. पण केवळ एखादी जबाबदारी मिळणे म्हणजेच सर्वकाही नसते. जेव्हा प्रामाणिक प्रयत्नांनंतरही असं वाटत राहतं की आपण आपल्या पूर्ण क्षमतेने जनतेची सेवा करू शकत नाही, तेव्हा एक कठीण निर्णय घेण्याची वेळ येते. माझ्या वडिलांचा निर्णय कधीही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हता. राजकीय पक्ष हे केवळ एक माध्यम असते, अंतिम ध्येय नेहमीच जनता आणि लोकसेवा हेच असायला हवे."
वडिलांनी अविरत सेवा केली; केवळ एका निर्णयावरून न्यायनिवाडा करू नका!
"लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी जे काही शक्य असेल, ते त्यांनी नेहमी केलं. रात्री उशिरापर्यंत बसून लोकांच्या समस्या अत्यंत संयमाने ऐकून घेताना मी त्यांना पाहिले आहे. त्यामुळे केवळ एका निर्णयावरून त्यांच्याबद्दल कोणताही न्यायनिवाडा करण्यापूर्वी, त्यांनी केलेल्या वर्षानुवर्षांच्या कामाकडेही एकदा पहा. त्या लोकांना विचारा ज्यांचे कठीण दिवस थोडे सोपे झाले, कारण सचिन अहिर त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते."
- किरण सचिन अहिर
?igsh=ZjF3a3JnNTllb204