ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार ?

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ५ जुलै - राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'ची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, अचूक आणि जलद करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) या आधुनिक डिजिटल व्यवस्थेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या राज्यातील शेतकरी वर्गात ”ॲग्रीस्टॅक म्हणजे नेमके काय?” आणि “कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार?” याबद्दल उत्सुकता आणि काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या डिजिटल प्रणालीची तांत्रिक वस्तुस्थिती समोर आली आहे.

नेमके काय आहे ‘ॲग्रीस्टॅक’?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख आणि शेतीशी संबंधित माहितीची एकत्रित संगणकीय नोंद (Digital Database) होय. या प्रणालीमध्ये शेतकऱ्याची जमीन, सातबारा, पेरा, बँक खाते, पीक कर्ज आणि इतर आवश्यक माहिती एकाच ठिकाणी लिंक (एकत्रित) केली जाते. यामुळे शासनाला अचूक शेतकरी ओळखणे आणि योजनांचा लाभ थेट मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे सोपे होणार आहे.

कर्जमुक्ती योजनेत ‘ॲग्रीस्टॅक’ची भूमिका

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्रता निश्चित करताना आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी करताना शासन 'ॲग्रीस्टॅक'चा मुख्य आधार घेणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आपली माहिती अद्ययावत (Update) ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना होणारे ४ मोठे फायदे:

Advertisement

१. गतिमान प्रक्रिया: कर्ज खात्याची आणि जमिनीची माहिती पडताळण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान होईल.

२. अचूक लाभार्थी निवड: अपात्र व्यक्तींना चाळणी लावून खऱ्या गरजू शेतकऱ्यांची निवड अचूकतेने करता येईल.

३. थेट आणि जलद लाभ: मंजुरीनंतर बँक खात्यात रक्कम जमा होताना होणारा तांत्रिक विलंब टळेल.

४. एक खिडकी योजना: भविष्यात एकाच माहितीच्या (डेटा) आधारे विविध शासकीय कृषी योजना, पीक विमा आणि अनुदानाचा लाभ घेणे सुलभ होईल.

माहिती काळजीपूर्वक तपासा; त्रुटी असल्यास त्वरित दुरुस्ती करा

ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करताना आधार प्रमाणीकरण, जमिनीचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक बाबी पूर्णपणे अचूक असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी आपली माहिती काळजीपूर्वक तपासून अद्ययावत ठेवावी. जर नोंदींमध्ये काही त्रुटी किंवा चुका असतील, तर त्या संबंधित महसूल किंवा कृषी यंत्रणेमार्फत वेळेत दुरुस्त करून घ्याव्यात, जेणेकरून कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भ्रष्टाचाराला आणि विलंबाला चाप लावत, योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रातील एक क्रांतीकारी पाऊल ठरणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.