दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ४ जुलै - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि सरकारचा 'किंमत स्थिरीकरण राखीव साठा' (बफर स्टॉक) मजबूत व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कांदा खरेदीदरात तब्बल १३ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार आता कांद्याचा खरेदीदर प्रति क्विंटल १,८७५ रुपयांवरून २,१२५ रुपये करण्यात आला आहे. हे नवीन दर आज, ४ जुलै २०२६ पासून देशभरात लागू झाले असून, सध्या 'नाफेड' (NAFED) आणि 'एनसीसीएफ' (NCCF) या संस्थांमार्फत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या २०२५-२६ च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, यंदा देशात ३०७.३७ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी (२०२४-२५) हे उत्पादन ३०७.६७ लाख मेट्रिक टन झाले होते. म्हणजेच यंदाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या आसपासच राहणार असल्याने देशात कांद्याची उपलब्धता पुरेशी आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे या हंगामातही कांद्याचे भाव किरकोळ प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाजारपेठेत साठेबाजीमुळे कृत्रिम तेजी?
सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये कांद्याचा साठा पुरेसा असून, बाजारात टंचाईची कोणतीही चिन्हे नाहीत. देशभरातील बाजारांमध्ये दररोज ५० हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त कांद्याची आवक होत आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रातून ३० हजार मेट्रिक टनांहून अधिक आवक होत असून, सरासरी घाऊक भाव १८ रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. तर देशात सरासरी किरकोळ दर ३१ रुपये प्रति किलो आहे.
दरम्यान, मान्सूनचे आगमन लांबल्याने व्यापाऱ्यांच्या एका वर्गाकडून भविष्यातील तेजीच्या अपेक्षेने कांदा खरेदी केला जात आहे. नाशिक आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतील उत्पादन केंद्रांवर भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने साठेबाजी होताना दिसत आहे. मात्र, प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये सध्याच्या दरांवर कांद्याला फारशी मागणी नाही. त्यामुळे ही तेजी प्रत्यक्ष मागणीमुळे नसून केवळ वाढीव दरांच्या अपेक्षेवर आधारलेली असल्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानी कांद्यामुळे निर्यातीचा वेग मंदावणार
देशातून सध्या कांदा निर्यात सुरळीत सुरू असून, जून २०२६ मध्ये सुमारे १.५० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत हा वेग मंदावण्याची शक्यता आहे. कारण आखाती देश, श्रीलंका आणि पूर्वेकडील देशांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा नवा कांदा अत्यंत कमी दरात उपलब्ध झाला असून, त्याचा फटका भारतीय निर्यातीला बसू शकतो.
नाशिकमध्ये खरिपाची पेरणी १५ दिवस लांबली!
यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील मुख्य कांदा पट्टा असलेल्या नाशिक भागात खरीप कांद्याची पेरणी सुमारे १५ दिवस लांबली आहे. दुसरीकडे, कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लकेरे पट्ट्यात खरिपाची पेरणी जवळपास ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन कांद्याच्या आवकीवर याचे काय परिणाम होतात, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.