नाशकात 'एफडीए'ची धडक कारवाई... या ७ हॉटेल्सवर छापा टाकून लायसन्स जागेवरच निलंबित...

Share:
Main Image
Last updated: 04-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ४ जुलै - नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संपूर्ण नाशिक विभागात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवनवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच एफडीए यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. गेल्या दोन दिवसांत नाशिक, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील २० मोठ्या हॉटेल्स व खाद्य आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून, गंभीर त्रुटी आढळल्याने ७ नामांकित हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने जागेवरच निलंबित करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

'या' ७ हॉटेल्सचे परवाने जागेवरच निलंबित:

१) हॉटेल ग्रीन वॉल, जत्रा लिंक रोड, पंचवटी, नाशिक

२) हॉटेल राधिका, द्वारका, नाशिक

३) हॉटेल क्राऊन पॅलेस, पेठ रोड, पंचवटी, नाशिक

४) लक्ष्मी हॉटेल, सिन्नर, नाशिक

५) हॉटेल त्रिमूर्ती, अजिंठा रोड, एमआयडीसी, जळगाव

Advertisement

६) हॉटेल भानू, जळगाव

७) जाधव रेस्टॉरंट, नंदुरबार

स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन

१ व २ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हॉटेल्सच्या स्वयंपाकघरातील (किचन) भयानक अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा (Fridges), अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न आढळून आले. तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करणे, ग्राहकांच्या तक्रार निवारणाची यंत्रणा नसणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आली.

सुधारणा न केल्याने भुसावळ, धुळ्यातील कॅन्टीनही बंद

यापूर्वी एफडीएकडून सुधारणा नोटीस देऊनही त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे भुसावळ येथील साकेगाव शिवारात असलेले 'हॉटेल जय' आणि धुळे येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये असलेले 'गजानान कॅन्टीन' या दोन आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय, तपासणी दरम्यान ४ आस्थापनांकडे वैध परवानाच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे वैध परवाना मिळेपर्यंत या चारही आस्थापनांचा अन्न व्यवसाय पूर्णतः बंद ठेवण्याचे लेखी निर्देश देण्यात आले आहेत.

"अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यवसायिकाची गय केली जाणार नाही. ही मोहीम पुढे अधिक व्यापक होणार आहे. नागरिकांनीही अन्नाचा दर्जा किंवा स्वच्छतेबाबत शंका असल्यास एफडीएकडे तक्रार नोंदवून 'सुरक्षित अन्न अभियानात' सहभाग घ्यावा."

— मंगेश माने, सह आयुक्त (अन्न), नाशिक विभाग

Advertisement

Comments

No comments yet.