संत सखाराम महाराज संस्थान आग... किती नुकसान झाले? पाहणी केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 04-Jul-2026

अमळनेर, (प्रतिनिधी) ४ जुलै - अमळनेर शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. "या संकटाच्या काळात शासन संस्थानच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच मंदिराच्या भव्य पुनर्बांधणीसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल," अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी संत सखाराम महाराज संस्थानाला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

४०० वर्षे जुना ऐतिहासिक सभामंडप जळून खाक

सुमारे अडीचशे वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या या पवित्र संस्थानात लागलेल्या आगीत मोठी हानी झाली आहे. मंदिराचा अप्रतिम नक्षीकाम असलेला सुमारे ४०० वर्षे जुना सागवान लाकडाचा ऐतिहासिक सभामंडप या आगीत पूर्णतः जळून खाक झाला आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Advertisement

धाडसी अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान

संकटाच्या अत्यंत कठीण प्रसंगी जीवाची पर्वा न करता, तात्परतेने आगीवर नियंत्रण मिळवून मोठी हानी टाळणाऱ्या अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्यासह कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव, आनंद झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, रफीक पठाण, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

वरिष्ठ अधिकारी आणि विश्वस्तांची उपस्थिती

पाहणी दौऱ्यादरम्यान संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त प.पू. श्री प्रसाद महाराज (गुरु ज्ञानेश्वर महाराज), विश्वस्त रविकांत देशमुख, जयंत मोडक, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक होते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पालिकेचे अधिकारी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.