एस.के. खेडकर, (नाशिक) ३ जुलै - भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या संपूर्ण राज्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अत्यंत वेगाने सुरू आहे. या मोहिमेची ग्राऊंड लेव्हलवर प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज थेट भर पावसात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अत्यंत दुर्गम अशा 'ठाणापाडा' गावात पोहोचले. तेथे केवळ पाहणी न करता, त्यांनी एका दिव्यांग मतदाराच्या घरी जाऊन त्यांचे प्र-गणना पत्र स्वतः भरून घेतले आणि उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष काम करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी त्यांच्यासोबत सुरगाण्याच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे, तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार सुयोग वाघमारे यांच्यासह महसूल आणि निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग मतदाराच्या घरी जाऊन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
ठाणपाडा हे गाव महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील हातगड ग्रामपंचायतींतर्गत येते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आज सकाळीच या सीमावर्ती गावाला भेट दिली. तेथे विशेष मतदार यादी सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या दरम्यान, त्यांनी गावातील दिव्यांग मतदार भाऊराव गुलाबराव मोरे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. तेथे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) उपस्थितीत 'एन्युमरेशन फॉर्म' (Enumeration Form) भरून घेणे, आवश्यक माहितीची पडताळणी करणे, तसेच स्कॅनिंग व डिजिटलायझेशनची संपूर्ण प्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिक अधिकाऱ्यांना करून दाखवले.
कामकाज अचूक आणि पारदर्शक करा!
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, "मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हा अत्यंत महत्त्वाचा आणि संविधानात्मक उपक्रम आहे. त्यामुळे सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) आपले कामकाज अत्यंत अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावे. दुर्गम व सीमावर्ती भागातील एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने कटिबद्ध आहे."
दळवट आश्रमशाळेचीही केली पाहणी
सीमेवरील गावाचा दौरा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दळवट येथील शासकीय आश्रमशाळेस अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील वर्गखोल्या, सोयी-सुविधा आणि शैक्षणिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्याबाबत त्यांनी शिक्षकांना व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.